IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : वानखेडे स्टेडियम आणखी एका आयपीएल २०२४ सामन्याच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहे. मुंबई इंडियन्सने मागील रविवारी दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून पराभवाची मालिका खंडीत केली. आता आजच्या सामन्यात त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान आहे. MI व RCB या दोन्ही संघांना आतापर्यंत एकच विजय मिळवता आलेला आहे, परंतु मुंबई ( ४) एक सामना कमी खेळलेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातील विजय हा पुढील वाटचालीच्या दृष्टीने RCB साठी खूप महत्त्वाचा आहे. २०१५ मध्ये RCB ने शेवटचं वानखेडेवर MI ला पराभूत केले होते.
विराट कोहलीला आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहने ४ आणि पियूष चावलाने ३ वेळा बाद केले आहे, परंतु त्याचा स्ट्राईक रेट हा बुमराहविरुद्ध १५३च्या वर, तर चावलाविरुद्ध १३०च्या वर राहिला आहे. बुमराहने आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेलला ५ वेळा बाद केले आहे. रोहित शर्मा व इशान किशन ही मुंबई इंडियन्सची दुसरी सलामीची जोडी आहे ( रोहित व क्विंटन डी कॉक) ज्यांमनी १२०० हून अधिक धावा जोडल्या आहेत. रोहित व किशन यांनी MI साठी सर्वाधिक १२ वेळा अर्धशतकीय भागीदारी केल्या आहेत. मोहम्मद सिराजला आयपीएलमध्ये एकदाही रोहितला बाद करता आलेले नाही. पण, त्याने किशनला दोनवेळा बाद केले आहे.
आरसीबीने आज विल जॅकला पदार्पणाची कॅप दिली. २५ वर्षीय विलसाठी RCB ने लिलावात ३.२ कोटी रुपये मोजले. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये ( SA20) विल जॅक्सने ( Will Jacks ) वादळी शतक झळकावले आहे. प्रेटोरिया कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या विल जॅक्सने डर्बन सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. त्याने ८ चौकार व ९ षटकारांसह ४२ चेंडूंत १०१ धावा कुटल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट हा २४०.४८ इतका होता. इंग्लंडच्या ऑल राऊंडरने ट्वेंटी-२०त १५७ सामन्यांत ३ शतकं व ३० अर्धशतकांसह ४१३० धावा केल्या आहेत.