मुल्लानपूर : यंदा आयपीएलच्या गुणतालिकेत सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेले पंजाब आणि मुंबई संघ विजयी मार्गावर परतण्यास सज्ज आहेत. गुरुवारी होणाऱ्या लढतीत विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. प्रत्येकी सहा सामन्यांत दोन्ही संघांचे समान चार गुण आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने गमावले आहेत. दोन्ही संघांनी आपला मागील सामना गमावला आहे. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे दहा दिवसांसाठी आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे पंजाबसमोरील आव्हान वाढले आहे.
पंजाब संघ- सलामी जोडीचे अपयश पंजाबसाठी चिंतेचा विषय आहे. अथर्व तायडे आणि जाॅनी बेअरस्टो यांना कामगिरी सुधारावी लागणार आहे.- शशांक सिंग व आशुतोष शर्मा यांनी शानदार कामगिरी केली. पण ते खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतात. त्यांचा फलंदाजी क्रम बदलावा लागेल. - प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा अपेक्षित कामगिरी करु शकले नाही. - सॅम करन, कॅगिसो रबाडा प्रभावी मारा करत आहेत. पण अर्शदीप सिंह व हर्षल पटेल काहीसे महागडे ठरले. पंजाबला गोलंदाजी सुधरावी लागेल.
मुंबई संघ- मुंबई संघात स्थिती बदलण्याची प्रचंड क्षमता आहे; पण त्यांना सांघिक कामगिरी करावी लागेल. - रोहित शर्मा, इशान किशन धडाकेबाज फलंदाजी करत आहेत. सूर्यकुमारही फाॅर्मात आहे. तिलक वर्मा, टिम डेव्हिड यांच्यामुळे मुंबईला फलंदाजीची चिंता नाही.- गोलंदाजीत जसप्रीत बुमराह फार्मात आहे. गेराल्ड कोएत्झी, आकाश मढवाल यांनी अधिक धावा दिल्या आहेत. - कर्णधार हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याने १२च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. फलंदाजीतही त्याला विशेष काहीही करता आलेले नाही. सामन्याची वेळ सायंकाळी ७.३० पासून