IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. RCB ने गुरुवारी पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे PBKS हे स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. विराट कोहली ( Virat Kohli) फलंदाजीतच नव्हे, तर क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी करून RCB च्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी त्याला फलंदाजीत साथ दिली, तर कर्ण शर्मा व स्वप्निल सिंग यांनी फिरकीच्या जोरावर मॅच फिरवली.
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
लक्ष्याचा पाठलाग करताना स्वप्निल सिंगने पहिल्या षटकात पंजाबच्या प्रभसिमरन सिंग ( ६) याला पायचीत केले. पण, त्यानंतर जॉनी बेअरस्टो व रायली रुसो ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी ३१ चेंडूंत ६५ धावा जोडल्या. बेअरस्टो १६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून २७ धावांवर बाद झाला. रुसोने २१ चेंडूंत फिफ्टी पूर्ण करून लढा सुरूच ठेवला होता. कर्ण शर्माने मॅचला कलाटणी दिली. रुसो २७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारासह ६१ धावांवर झेलबाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर जितेश शर्मा ( ५) याचाही कर्ण शर्माने त्रिफळा उडवला. त्यानंतर स्वप्निलने पंजाबचा पाचवा फलंदाज माघारी पाठवताना लिएम लिव्हिंगस्टोन भोपळ्यावर बाद केले. १४व्या षटकात विराटच्या भन्नाट थ्रोवर शशांक सिंग ( ३७) रन आऊट झाला आणि पंजाबला पराभव दिसू लागला.
मोहम्मद सिराजने सामन्यातील त्याची पहिली विकेट मिळवताना आशुतोष शर्माला ( ८) पायचीत केले आणि त्यानंतर फर्ग्युसनने PBKS ची शेवटची आशा सॅम कुरनचा ( २२) त्रिफळा उडवला. सिराजने आणखी २ विकेट घेताना हर्षल पटेल ( ०) व अर्शदीप सिंग ( ४) यांना बाद करून पंजाबचा संघ १८१ धावांत तंबूत पाठवला. बंगळुरूने ६१ धावांनी सामना जिंकला. बंगळुरुने विजय मिळवून १२ सामन्यांत गुणसंख्या १० वर नेली आहे आणि त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून १४ गुणांसह अजूनही प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा आहे. पण, इतरांच्या कामगिरीवर त्यांचे हे गणित अवलंबून असेल.
तत्पूर्वी, रजत पाटीदारने २३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५५ धावा करताना विराटसह ७६ धावा जोडल्या. विराट आणि ग्रीन यांनी ४२ चेंडूंत ९७ धावांची स्फोटक भागीदारी केली. विराट ४७ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ९२ धावांवर झेलबाद झाला. ग्रीन २७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर बाद झाला आणि बंगळुरूने ७ बाद २४१ धावा उभ्या केल्या. हर्षलने शेवटच्या षटकात तीन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : Big win for Royal Challengers Bengaluru, Stayed in the playoff race, but knocked out PBKS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.