IPL 2024 Play Off Scenario : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या निम्मा टप्पा पूर्ण झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ वगळल्यास सर्व संघांनी प्रत्येकी ८ सामने खेळले आहेत. सध्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तीन संघांच्या खात्यात प्रत्येकी १० गुण आहेत, दोन संघांकडे प्रत्येकी ८, दोन संघ प्रत्येकी ६, एक संघ ४ व एक संघ २ गुणांसह अद्याप स्पर्धेतील आपापले आव्हान टीकवून उभे आहेत. पण, अजूनही १४ गुण मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित नाही, तर २ गुणांसह सर्वात खालच्या क्रमांकावर असलेला RCB चा संघ स्पर्धेबाहेरही झालेला नाही.
आयपीएल २०२३ मध्ये काय झालेलं ते आठवा...
गुजरात टायटन्सला प्ले ऑफमधील आपली जागा निश्चित करण्यासाठी खात्यात २० गुण जमा करावे लागले होते. त्यांनी १४ पैकी १० सामने जिंकले तेव्हा त्यांचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला होता. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी प्रत्येकी १७ गुणांसह प्ले ऑफमधील जागा पक्की केली होती. साखळी फेरीत गुजरातने शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केल्यामुळे मुंबई इंडियन्सचा ( १६) मार्ग मोकळा झाला होता. तशीच परिस्थिती २०२४ मध्ये होऊ शकते.
आयपीएल २०२४ मध्ये कोणाला किती संधी
- राजस्थान रॉयल्स ८ सामन्यांत ७ विजय मिळवून १४ गुणांसह अव्वल स्थानी आहेत. पूर्वी ८ संघ होते तेव्हा १६ गुण प्ले ऑफसाठी पुरेशी होती, परंतु आता संख्या वाढल्याने किमान १८ किंवा २० गुण आवश्यक झाली आहेत. त्यामुळे RR ला उर्वरित ६ सामन्यांत किमान ३ विजय मिळवावे लागतील. जर त्यांनी पाच सामने गमावले तर त्यांना १६ गुणांसह इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.
- कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी प्रत्येकी १० गुणांसह अव्वल चारमध्ये एन्ट्री घेतलीय. पण, KKR व SRH हे ७ सामनेच खेळले आहेत आणि त्यांना उर्वरित ७मध्ये पाच विजय मिळवावे लागतील. जर त्यांनी ५ पेक्षा कमी सामने जिंकल्यास त्यांचेही गणित जर तर वर अडकून पडेल. तेच LSG ने ८ सामन्यांत १० गुण कमावले आहेत आणि त्यांच्या सहा लढती शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोरील आव्हान तगडं आहेच...
- चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स हे ८ सामन्यांत ८ गुण मिळवू शकले आहेत आणि त्यांना उर्वरित ६ सामन्यांत कमाल ४ आणि किमान ५ विजय मिळवावे लागतील, तर त्यांचे अनुक्रमे १६ आणि १८ गुण होऊ शकतील.
- मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना ८ सामन्यांत ६ गुण जमवता आले आहेत आणि त्यांना उर्वरित ६ सामन्यांत ५ विजय मिळवणे अनिवार्य आहेत. इतके करूनही इतरांच्या निकालावर त्यांचे गणित आहेच
- पंजाब किंग्स ८ सामन्यांत ४ गुणांसह नवव्या क्रमांकावर असला तरी ते उर्वरित सहा सामने जिंकून १६ गुण मिळवून प्ले ऑफमध्ये एन्ट्री घेऊ शकतात. दुसरीकडे २ गुण मिळवलेल्या RCB लाही सहा सामने जिंकून गुणसंख्या १४ करता येईल, परंतु त्यांचं गणित हे स्वतःपेक्षा इतरांवर अधिक अवलंबून आहे
Web Title: IPL 2024 Play Off Scenario : Even with 14 points, Rajasthan Royal's position is not secure, while Royal Challengers Bengaluru's not out of race
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.