Join us  

IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: कोलकाता आणि हैदराबाद सामन्याआधी एक महत्त्वाची बातमी आल्याने सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 4:42 PM

Open in App

IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील IPL चा क्वालिफायर-1 सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी अचानक आलेल्या एका बातमीने खळबळ उडाली आहे. अहमदाबाद विमानतळावर इसिसच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता क्वालिफायर 1 या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

क्वालिफायर-1 पूर्वी खळबळ

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील या सामन्याला हजारो प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की अहमदाबाद पोलिसांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा वाढवली ​​आहे. नुकताच घडलेला घटनाक्रम पाहता पोलीस सतर्क असून स्टेडियमच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे सुरक्षा कर्मचारी तैनात असतील, असे सांगण्यात आले आहे.

3000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात

सुरक्षेचा आढावा घेत पोलिसांनी सांगितले की 3000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. त्यात पोलिस उपअधीक्षक (डीसीपी) आणि 10 सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश असेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, याशिवाय 800 हून अधिक खाजगी सुरक्षा कर्मचारी देखील स्टेडियमच्या परिसरात उपस्थित राहणार आहेत. 20 मे रोजी अहमदाबाद विमानतळावर संशयित IS दहशतवाद्यांना अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या चौघांची ओळख श्रीलंकेचे नागरिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून, कोणताही गुन्हा करण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांनी श्रीलंकेतून चेन्नई असा प्रवास करून तेथून अहमदाबाद गाठल्याचे समजते. त्यांच्या अटकेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

KKR vs SRH मोठा संघर्ष

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील क्वालिफायर-1 मध्ये जो संघ जिंकेल, तो थेट चेन्नईमध्ये अंतिम सामना खेळेल. मात्र, या सामन्यात पराभूत झालेल्या संघाच्या आशा संपुष्टात येत नसून त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर-1 मधील पराभूत संघाचा सामना 24 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 सामन्यात एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी होईल. क्वालिफायर-2 मधील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ आठव्यांदा प्लेऑफमध्ये खेळणार आहे. तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ सातव्यांदा प्ले-ऑफमध्ये खेळणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सअहमदाबादनरेंद्र मोदी स्टेडियमइसिस