Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: यंदाच्या आयपीएलमधील शेवटचा टप्पा सुरु आहे. आता केवळ २ सामने शिल्लक असून त्यानंतर हंगामाचा विजेता मिळणार आहे. आतापर्यंत रंगलेल्या स्पर्धेत कोलकाताने अंतिम फेरी गाठली आहे तर हैदराबादच्या संघाला क्वालिफायर-1 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. एक पराभव झाला असला तरी साखळी फेरीत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने हैदराबादला पुन्हा एक संधी मिळाली आहे. आज हैदराबाद आणि राजस्थान या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीची लढत होणार आहे. यातील विजेता संघ अंतिम फेरी गाठेल. अशा परिस्थितीत हैदराबादचा आपला सर्वोत्तम संघ उतरवायचा प्रयत्न असेल. अशा वेळी संघात बदल केला जाण्याची शक्यता आहे.
बड्या सामन्यात स्टार खेळाडू संघात येणार!
हैदराबाद संघाचे सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघे चांगल्या फॉर्मात आहेत. राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन ही मधली फळीदेखील जबाबदारीने खेळ खेळत आहे. परंतु मधल्या फळीत वेळप्रसंगी संयमी खेळी करणाऱ्या अनुभवी खेळाडूची उणीव भासते आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर एडन मार्करमला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मोठ्या सामन्यांमध्ये अनुभवी खेळाडूचा समावेश करणे हैदराबादच्या पथ्यावर पडेल. त्यामुळे सनवीर सिंगला संघाबाहेरचा रस्ता दाखवून मार्करमला संधी दिली जाऊ शकते.
मधल्या फळीनंतर अब्दुल समद, शाहबाज अहमद आणि पॅट कमिन्ससारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. तर गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार, टी नटराजन हे वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी संघात केवळ एका बदलासह संघ उतरू शकतो असा अंदाज बांधला जात आहे.
हैदराबादचा संभाव्य संघ: ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्करम, नितेश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
क्वालिफायर-1 मध्ये झाला SRHचा पराभव
संपूर्ण स्पर्धेत २००चा टप्पा सहज गाठणारा हैदराबादचा संघ प्लेऑफ मध्ये मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीच्या अर्धशतकाच्या (५५) जोरावर त्यांनी १५९ धावा केल्या. मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने १३.४ षटकांत १६४ धावा केल्या. श्रेयस अय्यर (५८) आणि वेंकटेश अय्यर (५१) या दोघांनी नाबाद ९७ धावांची भागीदारी केली आणि संघाला फायनलमध्ये धडक मारली.