IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi २५ मार्चला पहिला विजय अन् बरोबर २५ एप्रिलला दुसऱ्या विजयाची नोंद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केली. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी त्यांनी यजमान सनरायझर्स हैदराबादवर ३५ धावांनी विजय मिळवला. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना हा विजय अत्यंत महत्त्वाचा होता, पण विजय मिळवून ते फार दिवे नाही लावू शकले.
२०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना SRH ला ८ बाद १७१ धावाच करता आल्या. SRH चा अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकटने ( ३-३०) स्लोव्हर चेंडूचा मारा करून विराट कोहली ( ५१) व रजत पाटीदार ( ५०) यांना चतुराईने बाद केले. रजत व विराट यांनी ३४ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीनने २० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, तर इम्पॅक्ट प्लेअर स्वप्निल सिंगने ( १२) धावा करून संघाला ७ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, हैदराबादचे स्फोटक फलंदाज आज फुसके बार ठरले. सलामीवीर अभिषेक शर्मा ( ३१), कर्णधार पॅट कमिन्स ( ३१) व शाहबाज अहमज ( ४०*) हे वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले.