IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात पुन्हा एकदा काही खास झालेली नाही. अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवण्याचा डाव पुन्हा फसला... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर शिवम दुबेची बॅट थंड झालेली दिसतेय, आजही तो गोल्डन डकवर परतला. कर्णधार ऋतुराज गायकवाड व डॅरिल मिचेल यांनी भार सांभाळला होता, परंतु त्यांनाही पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. राहुल चहरने सलग दोन चेंडूंवर दोन मोठ्या विकेट्स घेतल्या आणि CSK ला बॅकफूटवर फेकले.
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
PBKS विरुद्ध ऋतुराज गायकवाडला टॉस गमवावा लागला आणि CSK ला प्रथम फलंदाजीला यावे लागले. मथिशा पथिराणा ( Matheesha Pathirana) हा हॅमस्ट्रींगमुळे मायदेशात परतला आहे. तो श्रीलंकेत जाऊन पुढील उपचार घेणार आहे. पथिराणाने ७.६८च्या इकॉनॉमीने यंदाच्या आयपीएलमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. ऋतुराज व अजिंक्य रहाणे ही जोडी पुन्हा दमदार सुरुवात करून देण्यात अपयशी ठरली. अजिंक्यने ( ९) स्ट्रेट ड्राईव्ह चौकार खेचून आशा दाखवली, परंतु अर्शदीप सिंगच्या अप्रतिम यॉर्कवर तो मिड विकेटला झेल देऊन माघारी परतला. ऋतुराज व डॅरिल मिचेल यांनी ५७ धावांची भागीदारी करून संघाला ७ षटकांत १ बाद ६९ धावांपर्यंत पोहोचवले. स्ट्रॅटेजिक ब्रेकनंतर राहुल चहरने CSK ला सलग चेंडूंवर दोन धक्के दिले.
ऋतुराज २१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर झेलबाद झाला, तर शिवम दुबे गोल्डन डकवर माघारी परतले. दोन्ही फलंदाज चहरच्या फिरकीवर कट शॉट मारण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षक जितेश शर्माच्या हाती सोपे झेल देऊन परतले. मोईन अली हा पण त्या षटकात माघारी परतला असता, परंतु चहर परतीचा झेल घेण्यात अपयशी ठरला. हर्षल पटेलने पुढील षटकात CSK ला मोठा धक्का दिला. मिचेल १९ चेंडूंत ३० धावांवर पायचीत झाला. अम्पायर्स कॉलमुळे त्याला तंबूत जावे लागले. १ बाद ६९ वरून चेन्नईने ७५ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. पहिल्या १० षटकांत त्यांनी ४ बाद ७९ धावांपर्यंत मजल मारली.