IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर तुषार देशपांडेने ( Tushar Deshpande ) चेन्नई सुपर किंग्सला हवी तशी सुरुवात करून दिली. तुषारने पहिल्याच षटकात पंजाब किंग्सच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. तुषारचा मारा पाहून पंजाबचे चाहते आश्चर्यचकित झाले, कारण त्याने दोन्ही फॉर्मात असलेल्या फलंदाजांचे त्रिफळे उडवले.
CSK च्या फलंदाजीचा भार ऋतुराज गायकवाड ( ३२) , डॅरिल मिचेल ( ३०) व रवींद्र जडेजा यांनी उचललेला पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणे ( ९) सलामीला पाठवण्याचा CSK चा डाव पुन्हा फसला. गायकवाड व डॅरिल मिचेल यांनी ५७ धावांची भागीदारी करून संघाला ७ षटकांत १ बाद ६९ धावांपर्यंत पोहोचवले. स्ट्रॅटेजिक ब्रेकनंतर राहुल चहरने CSK ला सलग चेंडूंवर दोन धक्के दिले. मोईन अली ( १७) मोठी खेळी करू शकला नाही आणि मिचेल सँटनर ( ११) लगेच माघारी परतला. शार्दूल ठाकूरने १७ धावा केल्या, पण महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. जडेजा २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. चेन्नईला ९ बाद १६७ धावाच करता आल्या. हर्षल पटेल ( ३-२४) व राहुल चहर ( ३-२३) यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले, तर अर्शदीप सिंगने दोन व सॅम करनने एक विकेट घेतली.
तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात PBKS ला धक्के दिले. तुषारने तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोचा ( ९) त्रिफळा उडवला आणि त्यानंतर सहाव्या चेंडूवर रायली रुसोला आश्चर्यचकित चेंडूवर बोल्ड करून माघारी पाठवले. पंजाबने पहिल्या षटकात ९ धावांत २ विकेट्स गमावल्या. पण, शशांक सिंग व प्रभसिमरन सिंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूंत ५३ धावा जोडून पंजाबला सावरले. मिचेल सँटनरने ही जोडी तोडली आणि शशांक २७ धावांवर बाद झाला. पुढच्या षटकात रवींद्र जडेजाने PBKS चा आणखी एक सेट फलंदाज माघारी पाठवला. प्रभसिमरन ३० धावांवर झेलबाद झाला आणि पंजाबला ६८ धावांवर चौथा धक्का बसला.