IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज गुणतालिकेत एकाच नावेत सवार असलेल्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे. या दोन्ही संघांना ६ पैकी केवळ २ सामने जिंकता आलेले आहेत आणि प्ले ऑफसाठी आता त्यांना प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. रोहित शर्मासाठी हा ऐतिहासिक सामना आहे, कारण महेंद्रसिंग धोनीनंतर आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. पंजाब किंग्सकडून टॉससाठी पुन्हा सॅम कुरन आल्याने आजच्या सामन्यात शिखर धवन खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.
इशान किशन आयपीएलमध्ये अर्शदीप सिंगच्या १२ चेंडूंत ३ वेळा बाद झाला आहे, परंतु गोलंदाजाविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट हा २०८.३ असा राहिला आहे. कागिसो रबाडाविरुद्ध इशानने ३३ चेंडूंत ५८ धावा केल्या आहेत व एकदाच बाद झाला आहे. त्यामुळे MI vs PBKS मधील ही चुरस पाहणे औत्सुकतेचं असणार आहे. रोहित शर्माचा रबाडाविरुद्ध स्ट्राईक रेट हा १४८ असा राहिला आहे आणि दोन वेळा तो बाद झाला आहे. पण, सर्व प्रकारच्या ट्वेंटी-२०त रोहितने रबाडाच्या ७४ चेंडूंत ८९ धावा केल्या आहेत व चारवेळा आऊट झाला आहे. हर्षल पटेलविरुद्ध रोहितची कामगिरी काही खास नाही, त्याने २३ चेंडूत २७ धावा केल्या, परंतु तीनवेळा तो बाद झाला. रबाडा विरुद्ध सूर्यकुमार यादव ही लढत चुरशीची असेल.. सूर्याने रबाडाच्या ५२ चेंडूंत ९४ धावा चोपल्या आहेत, व ३ वेळा बाद झाला आहे.
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघात जॉनी बेअरस्टोच्या जागी रिली रोसू खेळणार आहे, तर अथर्व तायडेला आज विश्रांती दिली गेली आहे. toss हरलो हे बरं झालं, कारण आम्हालाही प्रथम फलंदाजी करायचीच होती. हार्दिक पांड्या म्हणाला, "आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, त्यामुळे नाणेफेक गमावणे चांगले आहे. आम्ही टीममध्ये बोललो आहोत की प्रत्येक व्यक्तीला संघाच्या ध्येयासाठी चांगली कामगिरी करावे लागेल."