Join us  

पंजाबच्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सचे बल्ले बल्ले! गोलंदाजांनी यजमानांना रडवले 

RR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 9:10 PM

Open in App

IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : पंजाब किंग्सचा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील परफॉरमन्स अपेक्षेनुसार कमकुवत राहिला. आज घरच्या मैदानावर त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर शेपूट घातले. आशुतोष शर्माने १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावांची फटकेबाजी करून पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. 

RR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला. अथर्व तायडेने ( १५) दमदार सुरुवात तर केली, परंतु आवेश खानने त्याची विकेट मिळवली. जॉनी बेअरस्टो मैदानावर उभा होता. प्रभसिमरन सिंगला ( १०) युझवेंद्र चहलने माघारी पाठवून पंजाबला ४१ धावांवर दुसरा धक्का दिला. बेअरस्टो 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' ठरला. केशव महाराजच्या पहिल्याच षटकात बेअरस्टो ( १५) झेलबाद झाला.  महाराजने त्याच्या पुढच्या षटकात पंजाबचा कर्णधार सॅम कुरनला ( ६) माघारी पाठवले.  पंजाबचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळतोय असे वाटलेच नाही, कारण राजस्थानचे वर्चस्व दिसले. कुलदीपने १३व्या षटकात पंजाबला आणखी एक धक्का देताना शशांक सिंगला ( ९) स्वस्तात माघारी पाठवले. त्याच षटकात लिएम लिव्हिंगस्टनचा झेल संजूने टाकला. जितेश शर्मा पंजाबसाठी मैदानावर उभा राहिला होता, परंतु धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो ( २९) झेलबाद झाला. आवेशने आजच्या सामन्यातील दुसरी विकेट घेतली. लिव्हिंगस्टनवर ( २१) सर्व भीस्त असताना दोन धावांचा मोह त्याला नडला. संजूने चतुराईने त्याला रन आऊट केले.

आशुतोष शर्माने अखेरच्या षटकांत चांगले फटके खेचून पंजाबला ८ बाद १४८ धावांपर्यंत पोहोचवले. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्स