IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली खरी, परंतु सनरायझर्स हैदराबादच्या २०वर्षीय नितीश कुमार रेड्डीने ( Nitish Kumar Reddy ) तुफान फटकेबाजी केली. SRH च्या ताफ्यातील मोठे खेळाडू फेल गेल्यानंतर PBKS आश्वस्त होते, परंतु २० वर्षाच्या पोराने त्यांना झोडून काढले. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने सामन्यात पुनरागमन केले आणि पंजाबसमोर तगडे आव्हान उभे केले. पंजाबसाठी अर्शदीप सिंगने ( ४-२९) चांगली गोलंदाजी केली.
PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कागिसो रबाडाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडसाठी झेलबादची जोरदार अपील झाले. जितेश शर्मा व कर्णधार शिखर धवन यांनी अपील केले. पण, DRS न घेतल्याने हेडला जीवदान मिळाले. त्यानंतर हेडने रबाडाच्या पुढच्या षटकात सलग ३ चौकार खेचले. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात पंजाब किंग्सला मोठी विकेट मिळवली. हेडने ( २१) खेचलेला मोठा फटका उत्तुंग उडाला आणि मिड ऑफला उभा असलेल्या धवनने पळत चांगला झेल घेतला. अर्शदीपने एक चेंडूच्या अंतराने एडन मार्करमला ( ०) बाद करून हैदराबादला २७ धावांवर दोन धक्के दिले. अभिषेक शर्मा ( १६) चांगल्या टचमध्ये दिसला, परंतु सॅम कुरनने त्याला गंडवले आणि माघारी पाठवले.