IPL 2024 , Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Marathi : जॉस बटलर, रियान पराग, संजू सॅमसन या राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांचा फॉर्म सुसाट असताना यशस्वी जैस्वालने मात्र चिंता वाढवली होती. पण, आज मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने यंदाच्या पर्वातील त्याच्या पहिल्या अर्धशतकाचे शतकात रुपांतर करून ती चिंता दूर केली. RR ने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये MI ला दुसऱ्यांदा हरवले. संदीप शर्माने घेतलेल्या ५ विकेट्सनंतर यशस्वीचे शतक राजस्थानच्या विजयात महत्त्वाचे ठरले. मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ कामगिरी केली.
राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र...
३ बाद २० वरून मुंबईला मोहम्मद नबीने ( २३) सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तिलक वर्मा ( ६५) व नेहाल वढेरा ( ४९) यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून संघाला ९ बाद १७९ धावांपर्यंत पोहोचवले. आवेश खान व संदीप शर्मा यांनी १९ व २० व्या षटकात टिच्चून मारा केल्याने मुंबईला रोखले गेले. संदीप शर्माने २०व्या षटकात तीन विकेट्स घेताना डावात १८ धावांत ५ विकेट्स पूर्ण केल्या. प्रत्युत्तरात, Impact player जॉस बटलर ( ३५) व यशस्वी जैस्वाल यांनी ७४ धावांची भागीदारी केली. जॉसच्या विकेटनंतर मुंबईला दुसरी विकेट घेता आली नाही. यशस्वी व कर्णधार संजू सॅमसन यांचे सोपे झेल अनुक्रमे नेहाल व टीम डेव्हिड यांनी टाकले.
यशस्वी व संजू यांनी ६५ चेंडूंत नाबाद १०९ धावा जोडताना राजस्थानाल १८.४ षटकांत १ बाद १८३ धावा उभारून दिल्या. राजस्थानने ९ विकेट्सने हा सामना जिंकून गुणतालिकेत ८ सामन्यांत ७ विजयासह १४ गुणांसोबत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली.
हार्दिक पांड्या म्हणतो..."आम्ही स्वतःला सुरुवातीलाच अडचणीत आणले. पण तिलक आणि नेहाल यांनी दमदार फलंदाजी केली. आम्ही शेवट चांगला करू शकलो नाही आणि त्यामुळेच १०-१५ धावा कमी पडल्या. आम्हाला स्टम्पवर मारा करायला हवा होता, पॉवर प्लेमध्येच आम्ही बऱ्याच धावा दिल्या. आज क्षेत्ररक्षणातही आमचा दिवस नव्हता. प्रत्येकाला त्यांची जबाबदारी माहित्येय, त्यामुळे या चुका सुधारायला हव्या आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मला संघात सतत बदल करणे आवडत नाही, मला खेळाडूंच्या पाठीशी राहायला आवडते. चांगलं क्रिकेट खेळणे हेच आमचे लक्ष्य आहे.''असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणाला.