RCB name change IPL 2024: आयपीएल 2024 सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. याआधी सोशल मीडियावर एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की लवकरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव बदलले जाऊ शकते. विराटच्या नेतृत्वाखालील RCBच्या संघाला स्पर्धा सुरू झाल्यापासून १६ वर्षात एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे नावात बदल करून संघाचे नशीब पालटेल का? अशीही चर्चा होताना दिसते आहे. मात्र, याबाबत फ्रँचायझीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आता IPL 2024 ची तयारी सुरू केली आहे. मात्र त्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे नाव बदलण्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर'चे नाव बदलून 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू' करण्याची तयारी सुरू असल्याचे लिहिले आहे. याची घोषणा १९ मार्च रोजी आरसीबी अनबॉक्स दरम्यान केली जाईल असाही दावा करण्यात आलाय. चाहतेही या पोस्टवर कमेंट करून आपले मत मांडत आहेत. एका चाहत्याने कमेंट करून लिहिले की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर एकही ट्रॉफी जिंकू शकले नाही. कदाचित आता काहीतरी बदल होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २२ मार्चपासून IPL 2024च्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना २२ मार्च रोजी होणार आहे. याआधी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आरसीबी कॅम्पमध्ये सामील झाला आहे. फाफ डू प्लेसिसने नेटमध्ये जोरदार सरावही केला. दुसरीकडे, चाहते आता विराट कोहलीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. विराट कोहलीबद्दल बातम्या येत आहेत की कोहली १७ मार्चपर्यंत टीम कॅम्पमध्ये सामील होऊ शकतो. विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दुसऱ्यांदा वडील झाल्यामुळे विराटने इंग्लंडसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले होते. त्यामुळे आता विराटला खेळताना पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.