IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी करताना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांना दडपणाखाली आणले. त्यामुळे विराट मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अर्धशतकाच्या उंबरठ्यावर झेलबाद झाला. त्यानंतर फॅफ दुर्दैवीरित्या रन आऊट झाला आणि तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयावर विराट संतापला. मिचेल सँटनरने त्याच्या चार षटकांत ( १-२३) या दोन्ही विकेट मिळवून दिल्या. पण, फॅफच्या रन आऊटवरून वाद सुरू झाला आहे.
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला आक्रमक सुरुवात करून दिली होती. पण, पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या सामन्यात CSK च्या फिरकीपटूंनी कमाल करून दाखवली. मिचेल सँटनर, महिशा तीक्षणा यांचे वळणारे चेंडू विराट व फॅफला समजायला बराच उशीर झाला. त्यामुळे RCB च्या धावांचा वेग बराच मंदावला होता. ३ षटकांत ३१ धावा चोपल्या होत्या, पंरतु पुढील ३ षटकांत केवळ ११ धावा RCB ला करता आल्या. हे दडपण कमी करण्यासाठी विराटने फटकेबाजी केली, परंतु ज्या सँटनरला टशन दाखवली त्यानेच विराटची विकेट घेतली. विराट २९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर बाद झाला. मिचेल सँटरनच्या गोलंदाजीवर डॅरिल मिचेलने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला.
९.४ षटकांत ७८ धावांवर बंगळुरूला पहिला धक्का बसला. सेट झालेल्या फॅफने हात मोकळे करताना ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यासह त्यानेही या पर्वात ४०० धावांचा टप्पा ओलांडला आणि मागील तीन पर्वात ४०० हून अधिक धावा करणारा शुबमन गिलनंतर तो दुसरा फलंदाज ठरला. पण, १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फॅफ दुर्दैवी रन आऊट झाला. सँटनरचा चेंडू रजत पाटीदारने सरळ खेचला अन् नॉन स्ट्रायकर एंडवर फॅफ पुढे गेला होता. चेंडू सँटनरच्या बोटाला लागून यष्टींवर आदळला. बेल्स उडाल्यानंतर फॅफची बॅट क्रिजमध्ये परतली आणि त्यामुळे तिसऱ्या अम्पायरने फॅफला बाद ठरवले. या निर्णयावर फॅफ नाराज दिसला आणि तंबूत बसलेल्या सहकाऱ्यांकडे पाहत होता. फॅफ ३९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर रन आऊट झाला. RCB ला ११३ धावांवर दुसरा धक्का बसला.