IPL 2024, RCB vs DC Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सचे ४ फलंदाजा त्यांनी ३० धावांत माघारी पाठवले. त्यात २२ वर्षीय जॅक फ्रेझर मॅकगर्क याच्या विकेटने विराट कोहलीला सर्वाधिक आनंदित केले. मॅकगर्कची आयपीएल २०२४ मधील कामगिरी पाहता तो RCB ची डोकेदुखी ठरू शकला असता, परंतु त्याच्या विकेटने विराटला आनंद झाला.
कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ६ ) व विराट कोहली ( २७) यांना मोठी खेळी करता आलेली नाही. विल जॅक्स व रजत पाटीदार यांनी RCB चा डाव सावरला आणि ५३ चेंडूंत ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बंगळुरूने पहिल्या १० षटकांत २ बाद ११० धावा केल्या, परंतु विल व पाटीदार यांच्या विकेटनंतर डाव गडगडला. पाटीदार ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर झेलबाद झाला आणि जॅक्सने २९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३२ धावा करून RCB ला ९ बाद १८७ धावांपर्यंत पोहोचवले. DC च्या गोलंदाजांनी अखेरच्या १० षटकांत बंगळुरूला ७७ धावांत ७ विकेट्स दिल्या.
बऱ्याच दिवसांनी संधी मिळालेल्या डेव्हिड वॉर्नरला ( १ ) पहिल्याच षटकात स्वप्निल सिंगने बाद केले. जॅक फ्रेझर-मॅकगर्क याने त्याच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी सुरू ठेवली. पण, तिसऱ्या षटकात यश दयालने दिल्लीला आणखी एक धक्का देताना अभिषेक पोरेलला ( २) माघारी पाठवले. पुढच्याच चेंडूवर शे होपने स्ट्रेट ड्राईव्ह मारला अन् नॉन स्ट्रायकर एंडवर मॅकगर्क ( २१ धावा, ८ चेंडू, २ चौकार व २ षटकार) रन आऊट झाला. यश दयालच्या हाताला चेंडू लागून यष्टींवर आदळला, पण मॅकगर्क क्रिजच्या बाहेर होता. मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात कुमार कुशाग्रची ( २) विकेट घेऊन दिल्लीला ४ बाद ३० असे कोंडीत पकडले.