Join us  

RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणदणीत विजय मिळवून इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 10:59 PM

Open in App

IPL 2024, RCB vs DC Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणदणीत विजय मिळवून इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. RCB ने सर्व आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले. DC या पराभवामुळे आता RCB च्या रांगेत येऊन बसले आहे. दोन्ही संघांचे १३ सामन्यांत १२ गुण झाले आहेत, परंतु नेट रन रेटमुळे दिल्लीचा प्ले ऑफचा मार्ग खडतर झाला आहे. हे दोन्ही संघ १४ गुणांपर्यंत मजल मारू शकतात आणि त्यांचे आव्हान इतर संघांच्या कामगिरीसोबतच नेट रन रेटवर अवलंबून आहे. 

२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

डेव्हिड वॉर्नर ( १ ), अभिषेक पोरेल ( २) हे दोन्ही फलंदाज माघारी परतले असताना जॅक फ्रेझर-मॅकगर्क याने फटकेबाजी सुरू ठेवली होती. त्याने ८ चेंडूंत २१ धावा चोपल्या होत्या. पण, तिसऱ्या षटकात यश दयालच्या चेंडूवर शे होपने स्ट्रेट ड्राईव्ह मारला अन् नॉन स्ट्रायकर एंडवर मॅकगर्क रन आऊट झाला. यश दयालच्या हाताला चेंडू लागून यष्टींवर आदळला, पण मॅकगर्क क्रिजच्या बाहेर होता. मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात कुमार कुशाग्रची ( २) विकेट घेऊन दिल्लीला ४ बाद ३० असे कोंडीत पकडले. शे होप व कर्णधार अक्षर पटेल यांनी ३६ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. पण, ल्युकी फर्ग्युसनने ही जोडी तोडली. होप २९ धावांवर बाद झाला आणि दिल्लीला ८६ धावांवर पाचवा धक्का बसला.   १२व्या षटकात त्रिस्तान स्तब्स काही विचार न करता एक धाव घेण्यासाठी पळाला... स्ट्राईकवर उभा असलेला अक्षर चेंडूकडे पाहत होता आणि त्याचे लक्ष आपल्याकडे नाही समजताच स्तब्स माघारी परतला. पण, तोपर्यंत गोलंदाज कॅमेरून ग्रीनने अचूक थ्रो करून त्याला रन आऊट केले. रिषभ पंतच्या गैरहजेरीत नेतृत्व करणाऱ्या अक्षरने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रसिख सलामने ( १०) अक्षरसह २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी करून DC च्या आशा कायम राखलेल्या. पण, कॅमेरून ग्रीनने त्याला बाद केले. यश दयालने १६व्या षटकात अक्षरला माघारी पाठवले. अक्षरने ३९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावांवर फॅफ ड्यू प्लेसिसच्या हाती झेल देऊन परतला. मुकेश कुमार ( ३) काहीच करू शकला नाही आणि दिल्लीचा पराभव पक्का झाला. DC चा संघ १४० धावांवर ऑल आऊट झाला आणि बंगळुरूने ४७ धावांनी बाजी मारली.

तत्पूर्वी, विल जॅक्स व रजत पाटीदार यांनी RCB चा डाव सावरला आणि ५३ चेंडूंत ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बंगळुरूने पहिल्या १० षटकांत २ बाद ११० धावा केल्या, परंतु विल व पाटीदार यांच्या विकेटनंतर डाव गडगडला. पाटीदार ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर झेलबाद झाला आणि  जॅक्सने २९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या.  कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३२ धावा करून RCB ला ९ बाद १८७ धावांपर्यंत पोहोचवले. DC च्या गोलंदाजांनी अखेरच्या १० षटकांत बंगळुरूला ७७ धावांत ७ विकेट्स घेतल्या.

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सविराट कोहलीअनुष्का शर्मा