Virat Kohli Record, IPL 2024 RCB vs PBKS: आयपीएल ही स्पर्धा सध्या अतिशय रंजक टप्प्यावर आहे. सध्या मुंबई इंडियन्स वगळता इतर सर्व संघ प्ले-ऑफच्या शर्यतीसाठी झुंजत आहेत. कोलकाता आणि राजस्थान या दोन संघांनी 16 गुण मिळवत प्ले-ऑफसाठी आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. हैदराबादने देखील कालच्या धडाकेबाज विजयानंतर प्ले-ऑफसाठी आपली प्रबळ दावेदारी सांगितली आहे. याशिवाय चेन्नई, दिल्ली आणि लखनौ हे तीन संघ प्रत्येकी 12 गुणांवर तर बंगळुरू, पंजाब, मुंबई आणि गुजरात हे चार संघ प्रत्येकी 8 गुणांवर आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उर्वरित सर्वच सामने अतिशय निर्णायक ठरणार आहेत. आज पंजाब आणि बंगळुरू यांच्यात सामना होणार असून या सामन्यात विराट कोहलीच्या एका खास विक्रमाकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
विराट कोहली हा विक्रमांच्या बाबतीत कायमच अग्रेसर असतो. कसोटी असो, T20 असो किंवा वनडे असो, विराट नवनवे विक्रम रचत असतो. आजच्या सामन्यातही त्याला एक मोठा आणि नवा विक्रम रचण्याची संधी मिळालेली आहे. आज धर्मशाला येथे पंजाब विरुद्ध आरसीबी असा सामना रंगणार आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून विराट कोहलीने आत्तापर्यंत पंजाब विरुद्ध झालेल्या 31 सामन्यांमध्ये 938 धावा ठोकल्या आहेत. जर आज विराटने 62 धावांची खेळी केली तर त्याला हजार धावांचा टप्पा गाठता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत पंजाब विरुद्ध 1000 धावांचा टप्पा कोणत्याही भारतीय फलंदाजाने गाठलेला नाही. त्यामुळे विराटने 62 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्यास तो पंजाब विरुद्ध हजार धावा ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरू शकतो.
आजच्या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पंजाब आणि बंगळुरू या दोघांमध्ये सामना रंगणार आहे. RCB सध्या सातव्या आणि पंजाब आठव्या स्थानी आहे, परंतु दोघांचेही गुण 8-8 असल्याने नेट रनरेट मुळे बंगळुरू एक स्थान वरती आहे. पण प्ले-ऑफमध्ये शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे अपरिहार्य आहे. याचाच अर्थ म्हणजे आजच्या सामन्यात पराभूत झालेला संघ हा यंदाच्या हंगामातून बाद ठरवला जाईल. अशा परिस्थितीत दोनही संघांमध्ये आज 'काँटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.
Web Title: IPL 2024 RCB vs PBKS Virat Kohli could become the first Indian to score 1000 runs against Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.