IPL 2024 Retention: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परत येणार, ही बातमी वाचून चाहते आनंदाने नाचत होते. पण, गुजरात टायटन्सने त्यांची संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली अन् त्यात हार्दिकला कर्णधारपदी कायम राखले. हार्दिकचे नाव पाहताच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या आनंदावर पाणी फिरले. हार्दिकच्या वृत्तानंतर मुंबई इंडियन्सच्या रिटेन व रिलीज खेळाडूंची नावं समोर आली. मागील दोन वर्ष केवळ नाव म्हणून संघात कायम ठेवलेल्या जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) मुंबई इंडियन्सने अखेर रिलीज करण्याचा निर्णय घेतला गेला.
मुंबई इंडियन्सने आज रिलीज केलेल्या ११ खेळाडूंपैकी ५ खेळाडू परदेशी खेळाडू आहेत. जोफ्रासह त्रित्सान स्तब्स, ड्युअन यानसेन, झाय रिचर्डसन, रिली मेरेडिथ व ख्रिस जॉर्डन या परदेशी खेळाडूंना करारमुक्त करण्याचा निर्णय आज मुंबई इंडियन्सने घेतला. यांच्यासह अर्शद खान, रमनदीप सिंग, हृतिक शोकीन, राघव गोएल व संदीप वॉरियर हेही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसणार नाही.
त्याचवेळी पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद यांना कायम राखले आहे. अर्जुन तेंडुलकरने मागील पर्वात आयपीएलमध्ये पदार्पण करताना ठिकठाक कामगिरी केली होती. तोही संघात कायम आहे. कॅमेरून ग्रीन, शॅम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयुष चावला, आकाश माधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड ( ट्रेड लखनौ सुपरजायंट्स) यांना कायम राखले आहे.