इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनेगुजरात टायटन्सचा ६ विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात दिल्लीकडून इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांच्या भेदक माऱ्यासमोर गुजरातचा डाव अवघ्या ८९ धावांत आटोपला. त्यानंतर दिल्लीने अवघ्या ८.५ षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात ९२ धावा कुटून हे लक्ष्य गाठलं. दिल्लीकडून मुकेश कुमारने २, तर इशांत शर्मा आणि टिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स टिपले. तर अक्षर पटेल आणि खलिल अहमद यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. मात्र सामन्यात दिल्लीने विजय मिळवल्यानंतर सामनावीराचा मान रिषभ पंत याला देण्यात आला. पंतने सामन्यात अवघ्या १६ धावा काढल्या होत्या. तरीही त्याला सामनावीराचा बहुमान मिळाल्याने एकच चर्चा होत आहे.
या सामन्यात रिषभ पंत याला सामनावीराचा सन्मान देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रिषभ पंतने सामन्यात यष्टीरक्षण करत असताना दोन जबरदस्त झेल टिपले होते. तसेच त्याशिवाय त्याने दोन फलंदाजांना चपळाईने यष्टीचितही केलं होतं. पंतने डेव्हिड मिलर (२) आणि राशिद खान (३१) यांचे झेल टिपले होते. तर अभिनव मनोहर (८) आणि शाहरुख खान (०) यांना यष्टीचित केले होते. या कामगिरीसाठीच त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. दरम्यान, रिषभ पंतची ही कामगिरी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी शुभसंकेत देत आहे.
दरम्यान, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर प्रतिस्पर्धी गुजरातच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. तसेच त्यांचा संपूर्ण संघ हा अवघ्या १७.३ षटकांमध्ये ८९ धावांत गारद झाला. ही धावसंख्या यंदाच्या हंगामातील कुठल्याही संघासाठीची निचांकी धावसंख्या ठरली. त्यानंतर दिल्लीने ८.५ षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात ९२ धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले.