Rohit Sharma: सर्वत्र होळी सणाचा उत्साह आहे. देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटीही होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. क्रिकेटपटू देखील होळीच्या रंगात न्हाऊन निघाले असून त्याची झलक समोर आली आहे. रोहित शर्मा होळी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो लेकीसाठी चिमुकला झाला असल्याचे दिसते. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यात रविवारी बहुचर्चित सामना पार पडला. गुजरातने ६ धावांनी सामना जिंकून विजयी सलामी दिली, तर मुंबईच्या संघाची परंपरा कायम राहिली आहे.
मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने देखील होळी खेळली. आपल्या लाडक्या लेकीसाठी हिटमॅन चिमुकला झाल्याचे दिसले. त्याने लहान मुलांसारखे पाण्यात भिजून कुटुंबीयांसोबत होळी खेळली. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या देखील यावेळी दिसला. त्याने रोहितची पत्नी रितीका सजदेहसोबत होळी खेळण्याचा आनंद लुटला.
दरम्यान, रविवारी मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सने ६ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची ठरली. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात होते. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. नंतर नमनने मुंबईचा मोर्चा सांभाळत काहीसा धीर दिला. रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा फायदा घेत सावध खेळी केली आणि डाव सावरला. मात्र, ही जोडी तंबूत परतल्यानंतर यजमानांनी पुनरागमन केले.
गुजरातची विजयी सलामी अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होता. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली. अशाप्रकारे मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला.