IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : १४८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ९२ धावांची सलामी दिली. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १० षटकांत सामना संपवतील असे वाटले होते, परंतु गुजरात टायटन्सच्या जॉश लिटलने सामन्याला कलाटणी दिली. त्याने धडाधड ४ विकेट्स घेऊन बिनबाद ९२ वरून RCB ची अवस्था ६ बाद ११७ अशी केली. बंगळुरूने २५ धावांच्या फरकाने ६ विकेट्स गमावल्याने सामना रंगतदार अवस्थेत आला. पण, दिनेश कार्तिक व स्वप्निल सिंग यांनी पडझड थांबवली आणि मॅच जिंकवली.
विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ५.५ षटकांत ९२ धावा चोपून विजय पक्का केला होता. विराटने सहावी धाव घेताच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १२५०० धावा पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. जॉश लिटलने GT ला पहिले यश मिळवून देताना फॅफला २३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ६४ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर आलेले विल जॅक्स ( १), रजत पाटीदार ( २), ग्लेन मॅक्सवेल ( ४) व कॅमेरून ग्रीन ( १) चुकीचे फटके मारून माघारी परतले. पण, यात विराट एका बाजूला उभा असल्याने RCB ला धीर वाटत होता. पण, नूर अहमदने गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. विराट २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला आणि RCB ला ११७ धावांवर सहावा धक्का बसला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून RCB ने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय योग्य़ ठरला. मोहम्मद सिराज ( २-२९), यश दयाल ( २-२१) यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. विराट कोहलीने एक भन्नाट रन आऊट करून सामन्याला कलाटणी दिली. विजयकुमार वैशाखने ( २-२३) २०व्या षटकात सलग ३ विकेट मिळवून दिल्या. त्यापैकी एक रन आऊट असल्याने त्याची हॅटट्रिक नाही झाली. गुजरातचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १४७ धावांत तंबूत परतला. GT कडून मोहम्मद शाहरुख खान ( ३७), डेव्हिड मिलर ( ३०) व राहुल तेवाटिया ( ३५) यांनी चांगला खेळ केला.