IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आज पुन्हा एकदा अविश्वसनीय खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांवर पहिल्या षटकापासून त्याने सुरू केलेला प्रहार १७व्या षटकात थांबला. लखनौ सुपर जायंट्सला त्याने मजबूत धावसंख्या उभी करून दिली. LSG ला आणखी जास्त धावा करता आल्या असत्या, परंतु मार्कस स्टॉयनिसच्या विकेटनंतर RCB च्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. ग्लेन मॅक्सवेलने दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. अनुज रावत व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या अफलातून झेलचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन व लोकेश लाहुल यांनी ५३ धावांची सलामी दिली. ग्लेन मॅक्सवेलने ही भागीदारी तोडताना लोकेशला २० धावांवर माघारी पाठवले. क्विंटनने आयपीएलमध्ये आज ३००० धावांचा टप्पा ओलांडला आणि एबी डिव्हिलियर्स व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यानंतर हा टप्पा ओलांडणारा तो तिसरा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला. क्विंटनला मार्कस स्टॉयनिसची चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.