IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गाडी घसरली. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी दमदार सुरुवात करून दिली. पण, विराटची विकेट पडली अन् पुढील ४२ धावांत त्यांचे पाच फलंदाज माघारी परतले. पॅट कमिन्सने एका षटकात दोन विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली आणि यातील एक विकेट ही फॅफ ड्यू प्लेसिसची होती. ही विकेट मिळताच SRH ची मालकिण काव्या मारन गोड नाचली.
'Sun' रायझर्स हैदराबादसमोर RCB गरगरले! अफगाणिस्तानच्या विक्रमासह ६ मोठे पराक्रम मोडले
IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजले. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा ( ३४) यांनी ७.१ षटकांत शतक झळकावले. हेड थांबणारा नव्हता आणि त्याने ३९ चेंडूंत शतक झळकावले. आयपीएल इतिहासातील हे चौथे सर्वात वेगवान व SRH कडून हे वेगवान शतक ठरले. हेड ४१ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०२ धावांवर बाद झाला. त्याची व क्लासेनची ५७ ( २६ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. हेडच्या विकेटनंतर क्लासेनने हात मोकळे केले आणि ३१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६७ धावा चोपल्या. एडन मार्कराम व अब्दुल समद यांनी १९ चेंडूंत ५६ धावा जोडल्या व संघाला ३ बाद २८७ धावांपर्यंत पोहोचवले.
आयपीएल इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याच पर्वात SRH ने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वोच्च २७७ धावा कुटल्या होत्या. समद १० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर, तर मार्करम १७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर नाबाद राहिला. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसने RCB ला अपेक्षित सुरुवात करून दिली. या दोघांनी ६.२ षटकांत ८० धावा फलकावर चढवल्या. मयांक मार्कंडेने सावत्या षटकात RCB ला मोठा धक्का दिला. विराट २० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर त्रिफळाचीत झाला.
फॅफने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विल जॅक्स ( ७) रन आऊट झाला, तर मार्कंडेने त्याची डावातील दुसरी विकेट घेताना रजत पाटीदारला ( ९) बाद केले. RCB ला १११ धावांवर ३ धक्का बसला. SRH च्या विजयाच्या मार्गात फॅफ ड्यू प्लेसिस हाच एक अडथळा उभा राहिला होता आणि १०व्या षटकात पॅट कमिन्सने अप्रतिम बाऊन्सरवर फॅफला चूक करण्यास भाग पाडले. फॅफ २८ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला. ही विकेट मिळताच काव्या नाचताना दिसली. कमिन्सने त्याच षटकात सौरव चौहानला बाद करून RCB ची अवस्था बिनबाद ८० वरून ५ बाद १२२ अशी केली.