Riyan Parag Batting, IPL 2024 RR vs DC: प्रत्येक IPL हंगामात कोणता नवा खेळाडू आपली छाप उमटवणार याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष असते. पण काही वेळा आधी फ्लॉप झालेला खेळाडू दमदार खेळी करून भाव खाऊन जातो. असाच प्रकार राजस्थानच्या संघातून घडला. दिल्ली विरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या रियान परागने तुफानी खेळ करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनेदिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. रियान परागच्या 84 धावांच्या संस्मरणीय खेळीच्या जोरावर राजस्थानला हा विजय मिळाला. रियान पराग खेळत असताना राजस्थानची अवस्था ३ बाद ३६ होती. पण त्याने राजस्थानला १८५ धावांची मजल मारून दिली. महत्त्वाचे म्हणजे आजारी असताना त्याने ही खेळी केली. त्यानेच या संदर्भात सामन्यानंतर सांगितले.
आसामचा २२ वर्षीय रियान पराग याने केवळ ४५ चेंडूत ८४ धावा केल्या. त्यापैकी शेवटच्या षटकांत २५ धावा झाल्या. या २५ धावा सर्वात निर्णायक ठरल्या. अशा परिस्थितीत, विजयानंतर, त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. तेथे त्याने कठीण परिस्थितीचा सामना करूनही ही खेळी कशी खेळली हे सांगितले. तो म्हणाला की, गेल्या तीन दिवसांपासून तो आजारी होता आणि अंथरुणावर पडून होता. त्याला उठून बसण्याचीही ताकद नव्हती. अखेर पेनकिलर घेऊन तो मैदानात आला. पण सामन्यात अशी खेळी केल्याने आणि विजयात हातभार लावल्याने त्याला खूप समाधान वाटले, असेही त्याने स्पष्ट केले.
रियान पराग IPL 2019 पासून राजस्थान रॉयल्ससोबत आहे. राजस्थानने त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आणि सलग ३ वर्षे संघात ठेवले. त्याला सतत संधी मिळत राहिल्या पण त्याची कामगिरी कधीच अपेक्षेप्रमाणे झाली नाही. IPL 2022 च्या हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावात राजस्थानने पुन्हा त्याच्यावर बोली लावली आणि ३ कोटी ८० लाखांच्या मोठ्या रकमेवर त्याला संघात घेतले. त्यानंतरही सलग दोन हंगामात तो विशेष काही करू शकला नाही. पण राजस्थानने त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आता या हंगामात मात्र त्याने सुरुवातीलाच धडाका दाखवून दिला आहे. पहिल्या सामन्यातही त्याने ४३ धावांची खेळी केली होती.