IPL 2024 RCB : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मंगळवारी तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ४ पैकी फक्त १ सामना RCB ला जिंकता आला आहे. एकिकडे घरच्या मैदानावर अन्य संघ विजय मिळवत असताना काल बंगळुरूत RCB ला लखनौ सुपर जायंट्सने पराभूत केले. फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व कॅमेरून ग्रीन यांना LSG समोर अपयश आले. युवा फलंदाज महिपाल लोमरोर ( ३३) याने दमदार खेळ केला, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता RCB वर टीका होत आहे आणि भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी याने अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याच्यावर टीका केली आहे.
... म्हणून १६ वर्ष RCB आयपीएल जिंकू शकले नाहीत; अंबाती रायुडूने केली पोलखोल
मॅक्सवेलला कालच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. चार सामन्यांत तो दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला, तर इतर सामन्यांत त्याने ३ व २८ अशा धावा केल्या. त्याची कामगिरी ही असमाधानकारक झालेली आहे आणि त्यामुळे RCB ची फलंदाजी कमकुवत झालेली आहे. ३५ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने RCB चा विश्वास मोडला आहे आणि तो फक्त पगार घेतो, परफॉर्मन्स काही देत नाही, असा आरोप मनोज तिवारीने केला आहे.
''तगड्या फलंदाजांची फौज असलेला संघ अशी RCB ची ओळख आहे, परंतु यावेळी ना त्यांचे फलंदाज धावा करत आहेत, ना गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. मधल्या फळीत अनुज रावतने पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती, परंतु तो त्याच्या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात कमी पडतोय,''असे तिवारी म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''तो उदयोन्मुख खेळाडू आहे, हे मी समजू शकतो. पण, संघात मोठी नावं असलेले खेळाडू आहेत, त्यांच्यासोबत वेळ घालवूही तुम्हाला काही शिकता येत नसेल तर तुमचं लक्ष नक्कीच दुसरीकडे आहे. ग्लेन मॅक्सवेलसारख्या मोठ्या खेळाडूला तगडी रक्कम देऊन संघात कायम ठेवले गेले आहे. पण, त्याचा पगार वेळेवर होते, परंतु परफॉर्मन्स काही देत नाही.''
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर १८२ धावांचे लक्ष्य RCBसाठी फार अवघड नव्हते, परंतु त्यांची २८ धावांनी हार झाली. RCB चा संपूर्ण संघ १५३ धावांत तंबूत परतला. खालच्या क्रमांकावर आलेला महिपाल लोमरोर याने १३ चेंडूंत ३३ धावांची स्फोटक खेळी करून LSG चं टेंशन वाढवले होते, परंतु RCB चे अन्य फलंदाज अपयशी ठरले.