Faf Du Plessis, Sam Curran Fined: रविवारचा दिवस हा IPL साठी डबल हेडर सामन्यांचा दिवस होता. रविवारी दुपारच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका धावेने पराभव केला. तर रात्रीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा तीन गडी राखून पराभव केला. दोन्ही सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगले. यात महत्त्वाचा भाग म्हणजे बंगळुरू आणि पंजाब दोन्ही संघांना पराभवाचा सामना तर करावा लागलाच, पण त्यांच्या कर्णधारांना मोठा दंडही ठोठवण्यात आला. त्यात विशेष बाब म्हणजे दोनही कर्णधारांना BCCIने वेगवेगळ्या कारणांमुळे दंड ठोठवला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याच्यावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना गमावल्यानंतर १२ लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. आयपीएलने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार हा दंड षटकांची कमी गती राखल्यामुळे ठोठवण्यात आलेला आहे. म्हणजेच RCBला ठरवून दिलेल्या वेळेत २० षटके टाकता न आल्याने हा दंड ठोठवण्यात आला.
फाफ डुप्लेसिस हा IPL च्या यंदाच्या हंगामात स्लो ओवर रेटचा बळी झालेला पहिला परदेशी आणि एकूण आठवा कर्णधार ठरला. याआधी यंदाच्या हंगामात शुभमन गिल, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनाही षटकांची गती कमी राखल्यामुळे दंड भरावा लागलेला आहे.
पंजाब किंग्स संघाचा कर्णधार सॅम करन याच्यावरही दंड भरण्याची नामुष्की ओढवली. त्याच्यावरील दंड हा षटकांची कमी गती राखल्यामुळे लावण्यात आलेला नाही. IPLने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, त्याने लेव्हल १ चा गुन्हा केला असल्याचे सिद्ध झाले आहे. सॅम करनने नियमावलीतील कलम २.८चे उल्लंघन केले. तसेच त्याने सामनाधिकाऱ्यांच्या समोर आपली चूक मान्यदेखील केली. त्यामुळे त्याला सामन्यातील त्याच्या मानधनाच्या ५०% रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली आहे.