IPL 2024 Team India cricketer retirement: भारतीय क्रिकेटचा एक अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर दिनेश कार्तिकने क्रिकेटला अलविदा केले. आरसीबीने त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला तेव्हाच त्याने निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट झाले. तशातच आता टीम इंडियाचा दमदार सलामीवीर शिखर धवन यानेही निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
ANI ला दिलेल्या मुलाखतीत, शिखर धवन म्हणाला- "माझ्या आयुष्यात सध्या परिवर्तनाचा टप्पा सुरु आहे. ज्या टप्प्यात माझं क्रिकेट कदाचित विश्रांतीच्या जवळ पोहोचत आहे आणि लवकरच नवा टप्पा सुरु होणार आहे. क्रिकेट किंवा कोणत्याही खेळाला वयाचं बंधन असतं असं मी मानतो. एका ठराविक वयापर्यंतच तु्म्ही सर्वोत्तम खेळ करू शकता. माझ्या आयुष्यात जास्तीत जास्त १-२ वर्षांचे किंवा त्याहून थोडेसे जास्त क्रिकेट शिल्लक आहे."
"यंदाच्या IPLमध्ये मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार मी स्पर्धेआधी तयारी देखील केली होती. पण माझं नशीबच खराब होतं. दुर्दैवाने यंदाच्या IPL मध्ये मला दुखापत झाली. पंजाब किंग्ज संघाकडून मला केवळ ४-५ सामनेच खेळायला मिळाले. त्यानंतर मला दुखापत झाल्याने माझा बराचसा वेळ रिकव्हर होण्यातच गेला. मी अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यामुळे मला आता क्रिकेट खेळण्यासाठी इतरही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे,"
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 हंगामातील पंजाब किंग्ज (PBKS) ची कामगिरी निराशाजनक होती. शिखर धवनचा पंजाब संघ साखळी फेरीअंती क्रमवारीत नवव्या स्थानावर राहिला. पंजाब किंग्जला शेवटच्या सामन्यात धरमशाला येथे RCB कडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला. धवनला ९ एप्रिल रोजी SRH विरुद्ध खांद्याला दुखापत झाली होती.