IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी हैदराबादमध्ये आज वादळ आणले... या दोघांनी ९.४ षटकांत फलकावर विजयी १६७ धावा चढवून सनरायझर्स हैदराबादला विक्रमी विजय मिळवून दिला. लखनौ सुपर जायंट्सच्या १६५ धावांचा SRH ने ९.४ षटकांत यशस्वी पाठलाग केला. यष्टींमागे उभा असलेला LSG चा कर्णधार लोकेश राहुल त्याच्या गोलंदाजांची धुलाई होताना पाहत होता आणि त्याच्याकडे त्यापलीकडे करण्यासारखे काहीच नव्हते. या सामन्यानंतर त्याच्या बोलण्यातून ती हतबलता स्पष्ट जाणवली.
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वी
SRH चा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पॉवर प्लेमध्ये ( ३-०-७-२) LSG ला जखडून ठेवले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल घेतले. कृणाल पांड्या ( २४) व लोकेश राहुल ( २९) यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले. बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी पॉवर प्लेमध्ये हैदराबादने १०७ धावा चढवल्या. आयपीएलमध्ये हैदराबादने दुसऱ्यांचा पॉवर प्लेमध्ये १००+ धावा केल्या आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरला. SRH ने ९.४ षटकांत बिनबाद १६७ धावा करून दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात १५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दहा षटकांच्या आत करणारा हा पहिला संघ ठरला. अभिषेकने २८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर हेडने ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या.
लोकेश राहुल काय म्हणाला?
माझे शब्द हरवले आहेत. आम्ही टीव्हीवर अशी फलंदाजी पाहिली आहे, पण ही काल्पनिक फलंदाजी आहे. हैदराबादच्या फलंदाजांचं कौतुक करायला हवं. त्यांनी आपल्या सिक्स हिटींग कौशल्यावर मेहनत घेतली आहे. दुसऱ्या डावात खेळपट्टी कशी असेल हे त्यांना आम्हाला जाणून घेण्याची संधी दिली नाही. त्यांना रोखणे कठीण होते कारण ते पहिल्या बॉलपासून आक्रमण करत सुटले. एकदा तुम्ही पराभूत झालो की घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. आम्ही ४०-५० धावा कमी केल्या. पॉवरप्लेमध्ये आम्ही विकेट गमावल्यानंतर आम्हाला गती मिळू शकली नाही. आयुष आणि निकीने चांगली फलंदाजी करत आम्हाला १६५ पर्यंत पोहोचवले. पण आम्ही २४० धावा केल्या असत्या तरी त्यांचा पाठलागही करता आला असता.
Web Title: IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Captain KL Rahul said after SRH badly beat LSG, "I'm lost for words, this is unreal batting".
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.