IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्सच्या १६५ धावांचा SRH ने ९.४ षटकांत यशस्वी पाठलाग केला. आयपीएल इतिहासात १५० हून अधिक धावांचा १० षटकांच्या आत यशस्वी पाठलाग करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला. त्यांनी ९.४ षटकांत एकही फलंदाज न गमावती ही मॅच जिंकली आणि गुणतालिकेत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. SRH च्या विजयाने चेन्नई सुपर किंग्सची चौथ्या स्थानी घसरण झाली, तर मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या.
SRH चा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पॉवर प्लेमध्ये ( ३-०-७-२) LSG ला जखडून ठेवले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल घेतले. कृणाल पांड्या ( २४) व लोकेश राहुल ( २९) यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले. बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. LSGच्या पॉवर प्लेमधील २७ ( २ विकेट्स) धावा पाहता SRH ला १६६ धावा जड जातील असे वाटले होते
अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी सनथ जयसूर्याचा १६ वर्षांपूर्वीचा पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकाराचा विक्रम मोडला. अभिषेक व ट्रॅव्हिस यांनी या आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये अनुक्रमे २४ व २३ षटकार खेचले. जयसूर्याने २००८मध्ये २२ आणि ख्रिस गेलने २०१५ मध्ये २१ षटकार खेचले होते.