आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्सला आपल्या दुसऱ्या सामन्यात देखील पराभवाचा सामना करावा लागला. (IPL 2024) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात बुधवारी सामना झाला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणून हैदराबादच्या डावाची नोंद झाली. जसप्रीत बुमराह वगळता मुंबईच्या सर्वच गोलंदाजांची बेक्कार धुलाई झाली. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्करम यांनी चांगलेच हात साफ केले. (IPL 2024 News)
हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने देखील स्फोटक सुरुवात केली. सुरुवातीला इशान किशनने छोटा पॅकेट बडा धमाका दाखवला. तर त्यानंतर तिलक वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर तिलकने जे सेलिब्रेशन केले त्याची चांगलीच चर्चा रंगली. सामन्यानंतर तिलकने याबाबत स्पष्टीकरण दिले असून सूर्यकुमार यादवसाठी हे सेलिब्रेशन असल्याचे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला की, हे सेलिब्रेशन 'सूर्या'साठी होते, त्याला आम्ही खूप मिस करत आहोत... लवकरत तो आमच्यासोबत जोडला जाईल. (Tilak Varma Celebration)
आमचा दादा सूर्या दादा!
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. 'सूर्या' शेवटच्या वेळी डिसेंबर २०२३ मध्ये मैदानात दिसला होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेपासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दोन्हीही सामन्यांमध्ये मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करत होता.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात यजमान हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत विक्रमी २७७ धावसंख्या उभारली. धावांचा यशस्वीरित्या बचाव करून हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने खूप संघर्ष केला. सलामीवीर इशान किशन आणि त्यानंतर तिलक वर्मा यांनी अप्रतिम खेळी करून सामन्यात रंगत आणली. पण विशाल आव्हानापर्यंत पोहोचताना मुंबईच्या शिलेदारांना घाम फुटला. २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला घाम फुटला. मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा करू शकला आणि सामना ३१ धावांनी गमावला.
Web Title: IPL 2024 srh vs mi tilak varma my fifty celebration was for Suryakumar Yadav
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.