Join us  

पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कोलकाता नाईट रायडर्सने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील आपली जागा पक्की केली आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात शर्यत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 5:11 PM

Open in App

IPL 2024 SRH vs PBKS Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफचे चारही संघ निश्चित झाले आहेत. पण, आता क्वालिफायर १साठी चढाओढ पाहायला मिळतेय. कोलकाता नाईट रायडर्सने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील आपली जागा पक्की केली आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात शर्यत आहे. त्यामुळेच पंजाब किंग्सविरुद्धचा साखळी सामन्यातील शेवटचा सामना SRH साठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून त्यांना १७ गुणांसह क्वालिफायर १ साठी दावा सांगता येईल, परंतु त्याचवेळी KKR विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या पराभवासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. राजस्थान १६ गुणांसह सध्या पुढे आहेत. 

PBKS चा कर्णधार जितेश शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. PBKS चे बरेच परदेशी खेळाडू मायदेशात परतले असल्याने रायली रूसो या एकमेव परदेशी खेळाडूंसह ते मैदानावर उतरले आहेत. आयपीएल इतिहासात प्रथमच प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच परदेशी खेळाडू खेळतोय. अथर्व तायडे व प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला दमदार सुरुवात करून देताना ९ षटकांत ९७ धावा फलकावर चढवून दिल्या. १०व्या षटकात टी नटराजनने ही भागीदारी तोडली आणि अथर्व २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर झेलबाद झाला. प्रभसिमरनने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. प्रभसिमरन आणि रायली रूसो यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन ४५ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७१ धावांवर झेलबाद झाला. विजयकांत वियास्कांत याने आयपीएलमधील त्याची पहिली विकेट घेतली.  पंजाबकडून यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणारा शशांक सिंग ( २) रन आऊट झाला. रूसो २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर झेलबाद झाला. SRH च्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करताना पंजाबच्या धावसंख्येवर चाप लावला. पण, कर्णधार जितेश शर्माने १५ चेडूंत नाबाद ३२ धावा करून पंजाबला ५ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२४पंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबाद