Join us  

सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 7:16 PM

Open in App

IPL 2024 SRH vs PBKS Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी २१५ धावांचा पाठलाग करताना SRH ला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला, परंतु अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी व हेनरिच क्लासेन यांनी दमदार फटकेबाजी केली. PBKS च्या गोलंदाजांना सैरभैर करून त्यांनी संघासाठी विजय खेचून आणला. या विजयासह SRH १७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. पण, आता संध्याकाळी राजस्थान रॉयल्सने विजय मिळवल्यास ( वि. KKR) हैदराबादचे क्वालिफायर १ खेळण्याचे स्वप्न भंगणार आहे.

 PBKS चा कर्णधार जितेश शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अथर्व तायडे व प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी ९ षटकांत ९७ धावा फलकावर चढवल्या. अथर्व २७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर झेलबाद झाला. प्रभसिमरन आणि रायली रूसो यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन ४५ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७१ धावांवर झेलबाद झाला. रूसो २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर झेलबाद झाला. कर्णधार जितेश शर्माने १५ चेडूंत नाबाद ३२ धावा करून पंजाबला ५ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले. 

अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर SRH च्या ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवून मोठी विकेट मिळवली. पण, अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी ही जोडी PBKS ला डोईजड झाली. दोघांनी पहिल्या पाच षटकांत ७२ धावा चोपल्या. त्रिपाठी १८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांवर बाद झाला आणि हर्षल पटेलने ही विकेट मिळवली. अभिषेक व नितीश कुमार रेड्डी यांनी ३१ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी करून संघाला १० षटकांत १२९ धावांपर्यंत पोहोचवले. अभिषेक २८ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांवर झेलबाद झाला. पण, हेनरिच क्लासेनने मोर्चा सांभाळला आणि संघाला १३ षटकांत १६७ पर्यंत पोहोचवले.

हैदराबादने सामना एकतर्फी केला होता. क्लासेन व रेड्डी यांनी २३ चेंडूंत ४७ धावा जोडल्या. रेड्डी २५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर माघारी परतला. SRH ला विजयासाठी ७ धावा हव्या असताना क्लासेन बाद झाला. त्याने २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा केल्या.  हैदराबाद १९.१ षटकांत ६ बाद २१५ धावा करून बाजी मारली. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्स