IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. SRH ७ सामन्यांत ५ विजय मिळवून १० गुणांसह सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तेच RCB ला ८ पैकी एकच सामना जिंकता आला आहे. विराट कोहली व रजत पाटीदार यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली आहे.
विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला ४१ धावांची सलामी दिली. विराटने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून ४००० हून अधिक धावा आज पूर्ण केल्या आणि यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. टी नटराजने हैदराबादला पहिले यश मिळवून देताना ड्यू प्लेसिसला २५ ( १२ चेंडू) धावांवर बाद केले. RCB ने पहिल्या सहा षटकांत १०च्या सरासरीने ६१ धावा उभ्या केल्या. सातव्या षटकात मयांक मार्कंडेने संथगतीने चेंडू टाकून विल जॅक्सला उल्लू बनवले. सरळ रेषेतील चेंडूवर जॅक्स ( ६) त्रिफळाचीत झाला. रजत पाटीदारने तिसऱ्या विकेटसाठी विराटला चांगली साथ देताना संघाला १० षटकांत २ बाद ९४ धावांपर्यंत पोहोचवले. SRH च्या फिरकीला रजत सुरेख फटके खेचताना दिसला. ११व्या षटकात मयांकच्या सलग ४ चेंडूंवर रजतने उत्तुंग षटकार खेचले. त्याने विराटसह २४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रजतने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर जयदेन उनाडकतने त्याला बाद केले. रजत २० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला आणि विराटसह ६५ (३४ चेंडू) धावांची भागीदारी तुटली.