IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. धावांचा पाऊस पाडणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघासमोर अडखळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे काहीच चालणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, घडले विपरितच.. प्रथम फलंदाजी करताना २८७ धावांच्या विक्रमी धावा करणाऱ्या SRH ला आज २०७ धावांचे लक्ष्य पेलवले नाही. RCB च्या गोलंदाजांनी संथ खेळपट्टीचा योग्य वापर करताना विजय मिळवला. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
२०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली होती. विल जॅक्सच्या पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेड ( १) माघारी परतला. अभिषेक शर्माने १३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यश दयालने त्याची विकेट घेतली. इम्पॅक्ट खेळाडू स्वप्निल सिंगने त्याच्या पहिल्याच षटकात एडन मार्करम ( ७) व हेनरिच क्लासेन ( ७) यांच्या विकेट मिळवल्या. त्यानंतर कर्ण शर्माने त्याच्या दोन षटकांत नितिश कुमार रेड्डी ( १३) व अब्दुल समद ( १०) यांना बाद केले. कर्णधार पॅट कमिन्स चांगली फटकेबाजी करताना दिसला. त्याने १५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावा कुटल्या, परंतु कॅमेरून ग्रीनने ऑस्ट्रेलिया संघातील सहकाऱ्याला माघारी पाठवले.
भुवनेश्वर कुमारलाही ( १३) ग्रीनने बाद केले आणि आता फक्त हैदराबादच्या पराभवाची औपचारिकता शिल्लक राहिली होती. शाहबाज अहमद एकटा खिंड लढवत राहिला, परंतु धावा व चेंडू यांच्यातले अंतर फार वाढले होते व जोखीम उचलता येईत इतक्या विकेटही हातात नव्हत्या. शाहबाज ४० धावांवर नाबाद राहिला, परंतु तो संघाला ८ बाद १७१ धावांपर्यंतच घेऊन जाऊ शकला. बरोबर एका महिन्यानंतर बंगळुरूचा संघ जिंकला.
तत्पूर्वी, विराट कोहलीचा संथ स्ट्राईक रेट आजही चर्चेचा विषय ठरला. SRH चा अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकटने ( ३-३०) स्लोव्हर चेंडूचा मारा करून विराट व रजत यांना चतुराईने बाद केले. रजत व विराट यांनी ३४ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. रजतने २० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा केल्या. विराटने ४३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५१ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने २० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, तर इम्पॅक्ट प्लेअर स्वप्निल सिंगने ( १२) धावा करून संघाला ७ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : SRH owner Kavya Maran shocked by RCB's unexpected win; RCB win by 35 runs against SRH
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.