IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे आणि रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्याआयपीएल २०२४ च्या सामन्यात तो सहभागी होण्याची शक्यता आहे. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीने ( NCA) बुधवारी तीन महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर असलेल्या मधल्या फळीतील फलंदाजाला तंदुरुस्त म्हणून घोषित केले.
बीसीसीआय आणि एनसीएमधील फिजिओंना कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि म्हणून सूर्यकुमारला खेळण्याची परवानगी देण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ घेतला. “तो आता तंदुरुस्त आहे. NCA ने त्याला काही सराव करायला लावला आणि तो चांगला दिसत होता. तो मुंबई इंडियन्स संघात सामील होऊ शकतो . आम्हाला खात्री करायची होती की जेव्हा सूर्या MI मध्ये परत जाईल तेव्हा तो १००टक्के तंदुरुस्त असेल,” असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि सुरुवातीला तो सात आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर आणखी एक दुखापत झाली आणि त्याला हर्नियाचे ऑपरेशन करावे लागले, ज्यामुळे त्याचा पुनरागमनाचा काळ लांबला. ICC रँकिंगमधील ट्वेंटी-२० त नंबर १ फलंदाज सूर्याची उपलब्धता मुंबई इंडियन्ससाठी मोठी गोष्ट आहे. त्यांना आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला.