- रोहित नाईकमुंबई - यंदाच्या सत्रातील पहिल्या विजयाच्या निर्धाराने घरच्या मैदानावर उतरलेल्या मुंबई संघाला राजस्थानविरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह मुंबईकरांना सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. त्याचवेळी, राजस्थानने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. मुंबईच्या फलंदाजीला जबर हादरे दिलेला ट्रेंट बोल्ट सामनावीर ठरला.
प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला २० षटकांत ९ बाद १२५ धावांवर रोखलेल्या राजस्थानने १५.३ षटकांमध्येच ४ बाद १२७ धावा करून बाजी मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचीही अडखळती सुरुवात झाली. मुंबईच्या आकाश मढवालने तीन बळी घेत मुंबईचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. परंतु, एका बाजूने टिकून राहिलेल्या रियान परागने सलग दुसरे नाबाद अर्धशतक झळकावत मुंबईचा पराभव स्पष्ट केला. रियानने १६व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर गेराल्ड कोएत्झीला दोन षटकार व एक चौकार मारत सामना संपवला.
त्याआधी, ट्रेंट बोल्टने दिलेले जबर हादरे आणि युझवेंद्र चहलने घेतलेली फिरकी यापुढे मुंबईचा डाव गडगडला. बोल्टने रोहित शर्मा, नमन धीर आणि डीवाल्ड ब्रेविस यांना भोपळाही फोडू दिला नाही. नांद्रे बर्गरने इशान किशनला बाद केल्यानंतर मुंबईची चौथ्याच षटकात ४ बाद २० धावा अशी अवस्था झाली. कर्णधार हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी पाचव्या गड्यासाठी ३६ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. परंतु, दोघेही बाद झाल्यानंतर मुंबईची धावगती पुन्हा मंदावली. टिम डेव्हिडच्या संथ फलंदाजीमुळे मुंबईच्या धावगतीवर परिणाम झाला.
सराव सत्रापासूनच झाली ट्रोलिंगला सुरुवातनाणेफेकीला सुरुवात होण्याआधी जवळपास पाऊण तासआधी मुंबई-राजस्थान संघाच्या खेळाडूंनी सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने ६.२५ वाजता वानखेडे स्टेडियमला धावून एक फेरी मारली. यावेळी, प्रत्येक स्टँडमधल्या प्रेक्षकांनी हार्दिक जवळ येताच ‘रोहित .. रोहित..’ अशी नारेबाजी करत हार्दिकला ट्रोल केले. यानंतर नाणेफेकीच्या वेळीही हार्दिकला प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. हार्दिक मुंबई संघाच्या संयोजनाची माहिती देत असतानाही प्रेक्षकांनी ‘बू’ करत त्याला ट्रोल केले.
बॅनरबाजीमध्येही रोहितचीच हवावानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने संदेश फलक हाती घेऊन रोहित शर्माला मोठा पाठिंबा दर्शविला. स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी मोफत संदेश फलक तयार करण्याची सुविधा ठेवली होती. यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी ‘रोहित तूच आमचा कर्णधार आहे,’ असा संदेश लिहून ‘हिटमॅन’ला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या बॅनरबाजीमध्येही रोहितचीच क्रेझ दिसून आली.
आयपीएलमध्ये सर्वाधिक १७ वेळा शून्यावर बाद होण्याच्या दिनेश कार्तिकच्या विक्रमाशी रोहित शर्माने केली बरोबरी. रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्यांमध्ये २४६ सामन्यांसह दुसरे स्थान मिळवताना दिनेश कार्तिकला (२४५) मागे टाकले. महेंद्रसिंह धोनी (२५३) अव्वल स्थानी कायम. आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा रविचंद्रन अश्विन दहावा क्रिकेटपटू ठरला.