IPL 2024 : विराट कोहलीच्या RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे फॅन्स हे सर्वात प्राामणिक असल्याचे म्हटले जाते. २००८ ला IPL सुरू झाल्यापासून RCB ला १६ वर्षांत एकदाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या स्पर्धेत बंगळुरूने पंजाब किंग्जला पराभूत केले होते, पण त्यानंतर त्यांना सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळेच सध्या RCBचा संघ ८ पैकी ७ सामने गमावल्यानंतर २ गुणांसह तालिकेच्या तळाशी आहे. पण असे असले तरीही RCBचे चाहते संघाशी जोडलेले आहेत. याच प्रामाणिक चाहत्यावर्गासाठी एक चांगली बातमी आहे.
सध्या RCB ज्या स्थितीत आहे, त्यानुसार त्यांना प्लेऑफ्स मध्ये पोहोचण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतील. आज त्यांचा सामना सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. आजपासून पुढील सर्व ६ सामने त्यांना जिंकावेच लागतील. त्यातही बंगळुरूने मिळवलेले विजय हे मोठ्या फरकाचे असतील तर आणखी चांगले कारण अशा परिस्थितीत त्यांचा नेट रनरेट चांगला राहील. जरी मोठ्या फरकाने सामने जिंकता आले नाहीत तरी किमान सर्व सामने जिंकावे लागतील यात दुमत नाही.
आता दुसरा मुद्दा हा RCBची मदत करू शकणाऱ्या ३ संघांशी संबंधित आहे. इतर संघांच्या भरवश्यावर IPL प्लेऑफ्स ची स्वप्न पाहणे ही कोणत्याही संघासाठी नवी गोष्ट नाही. RCBला तर या गोष्टीचा चांगलाच अनुभव आहे. RCBला यावेळी राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद अशा तीन संघांची मदत मिळाली तर ते प्लेऑफचा टप्पा गाठू शकतात. कारण हे Top 3 संघ आहेत.
जर हे तीनही संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचले तर RCBला नक्कीच संधी मिळू शकेल. त्यासाठी राजस्थानला उर्वरित ६ पैकी ४ सामने जिंकावे लागतील. तर कोलकाता आणि हैदराबादला ७ पैकी ५ सामने जिंकावे लागतील. असे झाल्यास, राजस्थानचे २२ आणि कोलकाता-हैदराबादचे प्रत्येकी २०-२० गुण होतील. मग उरलेल्या ७ संघांमध्ये संघर्ष होईल. यात जर RCB त्यांच्या ६ पैकी ६ सामने जिंकली तर ते १४ गुणांवर पोहोचेल आणि प्ले-ऑफसाठी पात्र ठरेल. कारण इतर संघांचे जास्तीत जास्त १२ गुण होऊ शकतील.