Dinesh Karthik Retirement IPL : राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून त्यांचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. मागील १६ वर्षांपासून आयपीएल ट्रॉफीच्या प्रतीक्षेत असलेल्या आरसीबीच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. चेन्नईला नमवून प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यात यशस्वी झालेल्या आरसीबीला बुधवारी राजस्थानने पराभवाची धूळ चारली. या सामन्यानंतर आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. कारण त्याने यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की, आयपीएलचा सतरावा हंगाम हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा असेल. आयपीएलच्या सतरा हंगामांमध्ये कार्तिक एकूण सहा संघांकडून खेळला. (IPL 2024 News)
आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामासाठी दिनेश कार्तिकला दिल्ली डेयरडेविल्सच्या संघाने खरेदी केले होते. त्यानंतर त्याने सहा संघांचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलचा प्रत्येक हंगाम खेळणाऱ्या सात शिलेदारांमध्ये कार्तिकची गणना केली जाते. मागील तीन हंगामापासून आरसीबीकडून खेळणाऱ्या कार्तिकने अखेर आयपीएलला रामराम केले. आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन हंगामात तो दिल्लीच्या संघाचा भाग होता. मग किंग्स इलेव्हन पंजाबकडून तो दिसला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचे कार्तिकने कर्णधारपद देखील सांभाळले. २०१३ च्या हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा राहिला. विशेष बाब म्हणजे कार्तिक एकाही आयपीएल विजेत्या संघाचा भाग राहिला नाही.
१७ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत दिनेश कार्तिकला केवळ एका हंगामात ५०० हून अधिक धावा करता आल्या. त्याने २०१३ मध्ये मुंबईकडून खेळताना ही किमया साधली होती. पहिल्या फळीत फलंदाजीची संधी मिळाल्याने कार्तिकला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. २०१६ आणि २०१७ मध्ये तो गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळला. दिनेश कार्तिक दिल्ली डेयरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सहा संघाकडून खेळला आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण २५७ सामने खेळले असून, ४८४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला २२ अर्धशतके झळकावता आली.
Web Title: IPL 2024 update Dinesh Karthik has retired from IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.