Mustafizur Rahman IPL: चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. अशातच आता त्यांच्या संघाची आणखी डोकेदुखी वाढल्याचे दिसते. कारण संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान पुढच्या किमान दोन सामन्यांना मुकणार आहे. खरं तर ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी यूएस व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो बांगलादेशला परतल्यामुळे आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार आहे. (IPL 2024 News)
मुस्तफिजुरने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीच्या सामन्यात चेन्नईसाठी चमकदार कामगिरी करून 'सामनावीर'चा पुरस्कार पटकावला. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात घातक गोलंदाजी केली होती. त्याने त्याच्या ४ षटकांत २९ धावा देत ४ बळी घेत आपल्या गतविजेत्या संघाला सहज विजय मिळवून दिला. डावखुरा वेगवान गोलंदाज सध्या सात बळींसह पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. चेन्नईचा आगामी सामना शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरूद्ध होणार आहे. जर मुस्तफिजुरने त्याच्या पासपोर्टचा विषय मार्गी लावला तर तो एप्रिलमध्ये किमान चार सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
दिल्लीकडून CSK चा पराभव
चेन्नईला आपल्या मागील सामन्यात दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स संघाने २० धावांनी CSK चा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला २० षटकांत ६ बाद केवळ १७१ धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या टप्प्यात तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. धोनीने ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १६ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या स्फोटक खेळीसाठी त्याला 'इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच' अवॉर्डने गौरवण्यात आले.
Web Title: IPL 2024 updates bangladesh player Mustafizur Rahman set to miss at least two matches for Chennai super kings, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.