IPL 2024 DC vs LSG : आयपीएलचा यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाची लढत होत आहे. आजचा सामना दोन्हीही संघासाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या लखनौच्या संघासमोर रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीचे आव्हान आहे. मागील सामन्याला मुकलेला पंत आज मैदानात दिसेल. दिल्ली कॅपिटल्सला देखील प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आज विजय मिळवणे आवश्यक आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ६४ वा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. (IPL 2024 News)
दरम्यान, खराब फॉर्मने त्रस्त असलेला लखनौचा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी मंगळवारी दिल्लीविरुद्ध भिडणार आहे. दिल्लीच्या बाद फेरीच्या किंचित आशा कायम आहेत. संघ मालकासोबत वाद झाल्यामुळे अखेरच्या दोन सामन्यांत लोकेश राहुल नेतृत्व करणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ सहाव्या तर लखनौ सातव्या स्थानावर आहे.
लखनौचा कर्णधार राहुल आणि सलामीवीर क्विंटन डिकॉक खराब फॉर्ममध्ये असल्याने संघ बॅकफूटवर आला. मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन यांच्यावर दडपण आहे. वेगवान गोलंदाज मयंक यादव जखमी झाल्याचा मोठा फटका बसला आहे. तर, यश ठाकूर, नवीन हे भरपूर धावा देत आहेत. मोहसीन हा जखमेमुळे मागचा सामना खेळला नव्हता. तसेच निलंबनानंतर रिषभ पंत संघात परतणार आहे. क्षेत्ररक्षण आणि झेल याबाबतीत त्याला सुधारणा करावीच लागेल. तरच प्ले ऑफ'ची आशा कायम राखता येईल. त्यासाठी दिल्लीला 'पॉवर प्ले' मध्ये धडाकेबाज सुरुवात अपेक्षित आहे.