आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. आयपीएल संपताच वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. आयपीएल सुरू असताना अनेक अफवा आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काही जण हे मुद्दाम करत असतात. यावरूनच आता माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा चांगलाच संतापला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या एका युजर्सला आकाश चोप्राने खडसावले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्टवर व्यक्त होताना चोप्राने चाहत्यांसमोर सत्य मांडले. माजी खेळाडूने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर एका पेजने सांगितले की, आकाश चोप्राने म्हटले आहे की, रोहित शर्माला २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी घ्यायला नको हवे होते. तो आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये देखील फ्लॉप ठरत आहे.
आकाश चोप्राची संतप्त प्रतिक्रिया अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर व्यक्त होताना आकाश चोप्राने म्हटले की, चुकीच्या गोष्टी आणि द्वेष पसरवण्यासाठी आयपीएलचा कालावधी बेस्ट आहे. फॅन आर्मी अशा गोष्टी करण्यासाठी नेहमी तयार असते. मला कधी कधी आश्चर्य वाटते की, व्ह्यूज नैतिकतेपेक्षा महत्त्वाचे आहेत काय. दरम्यान, बीसीसीआयने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अनेक आजी माजी खेळाडू आपापली प्रतिक्रिया देत आहेत.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद