IPL 2024 Updates: मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात अद्याप आपली लय पकडता आली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला सोमवारी आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने मुंबईला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. मुंबईचा कर्णधार हार्दिकला त्याच्या खराब फॉर्ममुळे टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने हार्दिकच्या समर्थनार्थ भाष्य करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात देखील संघाला पराभव पत्करावा लागला असून, रोहित कर्णधार असताना अनेकदा धावा करण्यात अपयशी ठरला असल्याचे सेहवागने सांगितले. (IPL 2024 NEWS)
सेहवाग म्हणाला की, मला वाटते की दिवसेंदिवस हार्दिक पांड्यावरील दबाव हा वाढत चालला आहे. हार्दिक एक अष्टपैलू असल्याने चाहते त्याच्याकडून अधिक अपेक्षा बाळगतात. मुंबई या आधी देखील अशा परिस्थितीतून गेली आहे. २०२१ आणि २०२२ मध्ये संघाला प्लेऑफचे तिकीट मिळवण्यात अपयश आले. मागील तीन हंगाम रोहित कर्णधार असताना देखील मुंबईला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पराभवाला हार्दिक जबाबदार आहे हे म्हणणे चुकीचे आहे. सेहवाग 'क्रिकबज'शी बोलत होता.
हार्दिकच्या समर्थनार्थ सेहवागची बॅटिंग
तसेच मला वाटत नाही की, एक गोलंदाज आणि फलंदाज म्हणून हार्दिक पांड्यावर फार दबाव आहे. पण, कदाचित त्याच्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांचा तो दबाव झेलत असावा. मागील हंगामात मुंबई अशाच स्थितीत होती. कर्णधार असताना रोहित धावा करू शकला नाही. तो मागील २-३ हंगामात ट्रॉफी देखील जिंकू शकला नाही. मुंबई फक्त हार्दिकवर अवलंबून राहू शकत नाही. हार्दिकनेही आता जास्त दबाव न घेता खेळी केल्यास त्याचा संघाला फायदा होईल, असेही वीरेंद्र सेहवागने सांगितले.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ भिडले. राजस्थानने पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर विजय साकारला आणि मुंबईला यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित २० षटकांत ९ बाद १७९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी सहज विजय मिळवला. राजस्थानने १८.४ षटकांत १ बाद १८३ धावा केल्या.
Web Title: ipl 2024 updates Former Team India player Virender Sehwag defends Mumbai Indians captain Hardik Pandya citing example of Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.