Gautam Gambhir On Shahrukh Khan : आयपीएलचा सतरावा हंगाम नाना कारणांनी खास ठरत आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ स्फोटक खेळी करून विक्रमांचा पाऊस पाडत आहे. याच हंगामात आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या झाली. पण, बुधवारी झालेला सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सच्या यांच्यातील सामन्याने सर्वांचे लक्ष वेधले. लखनौ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोएंका मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी लखनौचा कर्णधार लोकेश राहुलसोबत सामन्यानंतर साधलेला संवाद टीकाकारांना आमंत्रण देत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेकोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा मालक शाहरूख खानचे तोंडभरून कौतुक केले आहे.
बुधवारी सनरायझर्स हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान हैदराबादने १० गडी राखून विजय साकारला. पाहुण्या लखनौने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सलामी जोडी पाहुण्यांना भारी पडली. लखनौच्या दारूण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोएंका हताश दिसले. त्यांनी सामना संपताच कर्णधार लोकेश राहुलवर राग काढल्याचे पाहायला मिळाले. लखनौ सुपर जायंट्सच्या मानहानीकारक पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका प्रचंड (LSG owner Sanjiv Goenka) नाराज दिसले आणि ते सामन्यानंतर रागात कर्णधार लोकेश राहुलशी चर्चा करताना दिसले.
शाहरूखवर उधळली स्तुतीसुमने
अभिनेता शाहरूखबद्दल बोलताना गंभीरने म्हटले की, शाहरूख खान हा एक अप्रितम संघमालक आहे. मी आतापर्यंत ज्यांच्यासोबत काम केले आहे, त्यापैकी सर्वोत्तम ओनर म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. केकेआरच्या संघातील क्रिकेटच्या बाबतीत तो कधीही हस्तक्षेप करत नाही. तो नेहमी माझ्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्या निर्णयांना पाठिंबा देतो. अनेकदा तज्ञ म्हणून किंवा संघमालक म्हणून फक्त एका मिनिटात आणि एका सामन्याच्या आधारावर टीका केली जाते. त्या स्थितीत आपण असू तेव्हा काय परिस्थिती ओढावते याची कल्पना करा. दबावाच्या स्थितीत खेळाडूंना समजून घेतले पाहिजेत. शाहरूख खानला या गोष्टी माहीत आहेत. त्याला संघर्ष आणि दबाव यांची कल्पना असल्याने तो सर्वांना सामावून घेतो. गंभीर 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलत होता.
Web Title: IPL 2024 Updates Gautam Gambhir praises Kolkata Knight Riders team owner Shah Rukh Khan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.