Shah Rukh Khan News : सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून कोलकाता नाईट रायडर्सनेआयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरच्या संघाने अप्रतिम कामगिरी करून फायनलचे तिकीट मिळवले. त्यांनी पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादचा पराभव केला. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात मिचेल स्टार्कने कमाल करताना सामनावीरचा पुरस्कार पटकावला. (IPL 2024 Viral Video) सामना जिंकल्यानंतर केकेआरच्या संघाचा मालक आणि अभिनेता शाहरूख खानने उपस्थित चाहत्यांचे आभार मानले. त्याने संपूर्ण स्टेडियममध्ये फेरफटका मारून चाहत्यांच्या प्रेमाला दाद दिली. अशातच एक हास्यास्पद घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (IPL 2024 News)
सामना संपताच शाहरूख खान, मुलगी सुहाना खान आणि मुलगा अब्राहन खानसह मैदानात आला. त्याने चाहत्यांच्या दिशेने हातवारे करत त्यांचे आभार मानले. अशातच शाहरूख चुकून लाईव्ह शोमध्ये आला. हा शो माजी खेळाडू आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैना करत होते. समोर लाईव्ह शो सुरू असल्याची कल्पना नसलेला शाहरूख तिथे गेला अन् तो देखील अवाक् झाला.
आपण लाईव्ह शो सुरू असताना तिथे गेल्याचे लक्षात येताच शाहरूखने माफी मागितली. याशिवाय त्याने सर्व विश्लेषकांची गळाभेट घेतली. गळाभेट झाल्यानंतर जाता जाता शाहरूखने माफी मागितली पण आकाश चोप्राने म्हटले, "आपने हमारा दिन बना दिया". शाहरूखचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांसह नेटकरी यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
केकेआरची फायनलमध्ये धडक
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. चांगल्या फॉर्ममध्ये असलेले सलामीवीर (अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड) दोघेही स्वस्तात तंबूत परतले. अखेर १९.३ षटकांत १५९ धावांवर हैदराबादचा संघ गारद झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने अवघ्या १३.४ षटकांत लक्ष्य गाठले. कर्णधार श्रेयस अय्यरने ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत नाबाद ५८ धावांची स्फोटक खेळी केली. याशिवाय व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा कुटल्या.
Web Title: ipl 2024 updates kkr vs srh match Bollywood actor Shah Rukh Khan Apologises With Folded Hands, watch here video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.