IPL 2024 Updates : आयपीएलचा सतरावा हंगाम अंतिप टप्प्यात आला असून, केवळ दोन सामन्यांनंतर यंदाचा चॅम्पियन कोण ते समोर येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. आता सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलसाठी लढत होणार आहे. यातील विजयी संघ अंतिम सामन्यात केकेआरशी दोन हात करेल. आयपीएल २०२४ चा किताब कोण जिंकणार याबद्दल अनेकांनी आपला अंदाज वर्तवला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ब्रेट लीने आयपीएलची ट्रॉफी कोण उंचावणार याबद्दल भविष्यवाणी केली. (IPL 2024 News)
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली म्हणाला की, मला वाटते कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना होईल. आयपीएल २०२४ चा किताब केकेआर जिंकेल असेही वाटते. त्यांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी करून अव्वल स्थान गाठले. त्यामुळे ते अंतिम सामना जिंकून विजयी होतील. खरे तर केकेआरने सनरायझर्स हैदराबादला चीतपट करून फायनलमध्ये प्रवेश केला. तर, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवून आपले आव्हान कायम ठेवले. शुक्रवारी हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात फायनलच्या तिकीटासाठी लढत होईल. यातील विजयी संघ २६ मे रोजी केकेआरविरूद्ध किताबासाठी मैदानात असेल.
बुमराहचे विशेष कौतुक याशिवाय ब्रेट लीने आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकाबद्दल भाष्य करताना जसप्रीत बुमराहचे विशेष कौतुक केले. जसप्रीत बुमराह असा गोलंदाज आहे जो कोणत्याही परिस्थितीत, खेळपट्टीवर प्रभावी कामगिरी करू शकतो. ही त्याची जमेची बाजू आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश असेल, असे ब्रेट लीने बुमराहबद्दल सांगितले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद