IPL 2024 Updates : आयपीएलचा सतरावा हंगाम विविध कारणांनी खास ठरत आहे. या हंगामात इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या झाली, तर युझवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक (२०० हून अधिक) बळी घेणारा गोलंदाज ठरला. पंजाब किंग्सचा संघ यंदा साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. संघाचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे उर्वरित हंगामाला मुकला. मग सॅम करन पंजाबची धुरा सांभाळत आहे. रविवारी पंजाबला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव पत्करावा लागला. पंजाबच्या फ्रँचायझीची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा अनेकदा आपल्या संघाला चीअर करताना दिसते.
प्रेक्षक गॅलरीत बसलेली प्रीती खेळाडूंचा उत्साह वाढवत असते. पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याचा हर्षल पटेलने त्रिफळा उडवला. पंजाबची मालकीण प्रीती झिंटा सध्या नाना कारणांनी चर्चेत असते. आता तिने माहीबद्दल एक टिप्पणी केली, ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर #pzchat च्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान एका चाहत्याने प्रीतीला एक भारी प्रश्न केला. मॅम आम्हाला महेंद्रसिंग धोनीपंजाब किंग्सच्या संघात हवा आहे? या प्रश्नावर प्रीतीने म्हटले की, प्रत्येकाला धोनी हवा आहे आणि माझ्यासहीत सगळेजण त्याचे चाहते आहेत. काल एक कठीण दिवस होता. माझी इच्छा होती की, आमचा विजय व्हावा आणि धोनीने मोठे षटकार मारावे. पण दुर्देवाने आम्ही सामना गमावला आणि धोनी शून्यावर बाद झाला. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण शेवट चांगला झाला नाही.
दरम्यान, आयपीएलच्या ५३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सचा २८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद केवळ १३९ धावा करू शकला आणि २८ धावांनी सामना गमावला.