IPL 2024 Updates : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून यंदाच्या हंगामातील चौथा विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबादच्या संघाचा ७ गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर देखील हैदराबादचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान मिळवणाऱ्यांच्या शर्यतीत कायम आहे, तर मुंबईचा रस्ता बंद झाला आहे. आताच्या घडीला हैदराबादचा संघ ११ सामन्यांत १२ गुणांसह चौथ्या स्थानावर स्थित आहे. हैदराबादचे आघाडीचे फलंदाज यंदा चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत.
मुंबई इंडियन्सविरूद्धच्या पराभवानंतर पॅट कमिन्सने काही प्रश्नांवर भारी उत्तरे दिली. याशिवाय त्याने त्याच्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूबद्दल भाष्य केले आहे. कमिन्सने सांगितले की, जसप्रीत बुमराह माझा आवडता भारतीय खेळाडू आहे. बुमराहविषयी बोलताना त्याने भारतीय दिग्गजाचे तोंडभरून कौतुक केले. कमिन्स Humans of Bombay च्या पॉडकास्टवर बोलत होता. सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात बुमराहने ४ षटकांत २३ धावा देत १ बळी घेतला. यापूर्वीच्या सामन्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरूद्ध हैदराबादने २० षटकांत ३ बाद तब्बल २७७ धावा कुटल्या होत्या. या सामन्यात सर्व गोलंदाजांची धुलाई झाली पण बुमराहने ४ षटकांत केवळ ३६ धावा दिल्या.
दरम्यान, जसप्रीत बुमराह पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने १२ सामन्यांत १८ बळी घेतले आहेत. बुमराहचा संघ मुंबई इंडियन्स यंदा अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या मुंबईला केवळ चार सामने जिंकता आले. मुंबईचा संघ १२ सामन्यांत आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.