IPL 2024 Updates : आयपीएल २०२४ चा किताब उंचावण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. (KKR vs SRH Match Updates) रविवारी होत असलेल्या या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. तर केकेआरने हैदराबादला पराभवाची धूळ चारून अव्वल स्थान कायम राखले. रविवारी २६ मे रोजी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. (IPL 2024 News)
कोलकाता-हैदराबाद या आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यासाठी चेन्नईचे एम. चिदंबरम स्टेडियम सज्ज झाले आहे. परंतु, शनिवारी संध्याकाळी ४.४५ वाजता पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे केकेआरच्या संघाला सराव करता आला नाही. केकेआरचे शिलेदार आपला सराव अर्धवट सोडून परतले. खरे तर पावसामुळे रविवारी अंतिम लढत झाली नाही, तर हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी खेळविण्यात येईल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरच्या संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थान गाठले. तर हैदराबादच्या संघाने स्फोटक खेळीच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकांत तब्बल २८७ धावा करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. या आधी त्यांनी मुंबई इंडियन्सविरूद्ध २७७ धावा करण्याची किमया साधली.
दरम्यान, मागील वर्षी अर्थात आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात पावसाने बॅटिंग केली होती. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना रात्री उशीरापर्यंत चालला. अखेर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने बाजी मारून सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. गुजरातला सलग दुसऱ्यांदा किताब जिंकण्यात अपयश आले.