IPL 2024 Updates RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला नमवून प्ले ऑफचे तिकीट मिळवले. यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला. एक वेळ असा होता जेव्हा आरसीबी स्पर्धेबाहेर होईल असे वाटत होते. मात्र, सलग सहा सामने जिंकून फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने पहिल्या चारमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. पण, एक योगायोग पाहिला तर आरसीबीच्या चाहत्यांचे टेन्शन वाढताना दिसत आहे. (IPL 2024 News)
आरसीबीला पहिल्या आठ सामन्यांमधील सात सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा आरसीबीचा संघ स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता होती. मात्र, त्यानंतर आरसीबीने सलग सहा सामने जिंकून प्ले ऑफचे तिकीट मिळवले. खरे तर आरसीबीला साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात कमीत कमी १८ धावांनी विजयाची गरज होती आणि त्यांनी ही किमया साधून अखेर तिकीट मिळवले. या आधी देखील आरसीबीने सलग पाच किंवा त्याहून अधिक सामने जिंकण्याची किमया साधली आहे. आरसीबीने या आधी तीनवेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. पण, प्रत्येकवेळी संघाला अखेरच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आयपीएल २०११ मध्ये आरसीबीने सलग ७ सामने जिंकले आणि त्यानंतर संघ अंतिम फेरीत गेला. आयपीएल २००९ मध्येही संघाने सलग ५ सामने जिंकले होते आणि तरीही संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. आयपीएल २०१६ मध्येही आरसीबीने सलग ५ विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली होती. आरसीबी तिन्ही वेळा फायनलमध्ये गेली पण त्यांना किताब जिंकता आला नाही. अंतिम फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. खरे तर यंदा देखील आरसीबीने सलग सहा सामने जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे यंदा देखील इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी भीती आरसीबीच्या चाहत्यांच्या मनात आहे.